होमपेज › Kolhapur › विविध पक्ष, संघटनांचा घरफाळा वाढीस विरोध

विविध पक्ष, संघटनांचा घरफाळा वाढीस विरोध

Published On: Feb 20 2018 1:20AM | Last Updated: Feb 20 2018 12:43AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

महानगरपालिकेतर्फे करण्यात येणार्‍या प्रस्तावित घरफाळा वाढीस विविध पक्ष आणि संघटनांनी विरोध दर्शविला असून शिवसेनेतर्फे मंगळवारी सकाळी महापालिकेसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.  महापालिकेने दहा ते 30 टक्के घरफाळा वाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावर मंगळवारी होणार्‍या सर्वसाधारण सभेत निर्णय होणार आहे. मात्र, घरफाळा वाढ हा अन्याय असून त्यास विरोध करण्याचा विविध पक्ष संघटनांनी निर्णय घेतला आहे. शिवसेनेतर्फे प्रस्तावाविरोधात मंगळवारी सकाळी 11 वाजता महापालिकेसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. माजी नगरसेवक संघटनेतर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे विरोध करण्यात आला आहे. 

पत्रकात म्हटले आहे, राज्यात सर्वाधिक घरफाळा कोल्हापुरात आहे. महापालिकेचे उत्पन्‍न वाढले पाहिजे. मात्र अन्यायी घरफाळा वाढ करू नये. 500 चौ.फू. व्यवसायिक मिळकतींना घरफाळा वाढ लागू करा. शहरात झोपडपट्टीधारक मध्यमवर्गीय नागरिकांची घरे 500 चौ.फू.पेक्षा जास्त आहेत.त्यांच्यावर अन्यायकारक होणार आहे. भाड्याने घर देऊन उपजीविका करणार्‍यांना सवलत द्यावी, उत्पन्‍नाचे विविध मार्ग असताना त्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. पत्रकावर अनिल कदम, सुजय पोतदार, रामदास भाले, अनिल चव्हाण, किरण दरवान, आप्पा गायकवाड, चंद्रकांत सांगावकर, अशोक जामसांडेकर, सुनील टिपुगडे, विलास केसरकर, विश्‍वनाथ सांगावकर यांच्या सह्या आहेत.   

जादा घेतलेले 20 टक्के परत  करा : कॉमन मॅनची मागणी 

प्रस्तावित घरफाळा वाढीत रहिवासी क्षेत्रास दहा ते 20 टक्के वाढ होणार आहे. व्यावसायिक गाळ्यांसाठी 20 ते 30 टक्के आणि भाडेकरूच्या मिळकतीसाठी दुप्पट कर आकारणी होणार आहे. मुळात घरफाळा वाढ चुकीची आहे. परंतु, आतापर्यंत 20 टक्के जास्त दराने आकारणी केलेला घरफाळा रक्‍कम परत करावी, अशी मागणी कॉमन मॅन संघटनेने केली आहे. याबाबतचे पत्रक अ‍ॅड. बाबा इंदुलकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे. 
पत्रकात म्हटले आहे, शासनाने भांडवली मूल्यावर आधारित घरफाळा आकारणीची मुभा दिली आहे.

सन 2011-12 पासून ही कर आकराणी करण्याचे धोरण आहे. महापालिकेने तयार केलेल्या नियमावलीस शासनाची परनवागी नाही. अशा करआकारणीसाठी जमिनीचे क्षेत्र किंवा इमारतीचे चटईक्षेत्र विचारात घ्यावे लागणार आहे. मात्र, मनपाने भांडवली मूल्य ठरविण्यासाठी चटईक्षेत्र विचारात न घेता बांधीवक्षेत्र विचारात घेतले आहे. या प्रक्रियेत तब्बल 20 टक्के जादा दराने घरफाळा आकारणी करून 33 कोटी रुपये जास्त घरफाळा वसूल केला आहे. भांडवली मूल्यावर घरफाळा आकारणी करताना रहिवाही, व्यावसायिक आणि भाडेपट्ट्यावर असे मिळकतीचे वर्गीकरण करता येणार नाही. त्यामुळे यापूर्वी बेकायदेशीररीत्या जनतेकडून वसूल केलेले 33 कोटी रुपये तातडीने परत करावेत. 

प्रस्तावित घरफाळा वाढ चुकीची असल्याची तक्रार दिलीप पाटील यांनी  आयुक्‍तांकडे केली आहे. तक्रारीत म्हटले आहे, शहरात अनेक इमारतींची भाडेकरू अशी नोंद करण्यात आलेली नाही. वाणिज्य इमारतींची पाहणी केल्यास 60 टक्के मिळकतींचा भाडेकरू वापर तर 40 टक्के इमारतीचा मालक वापर आहे. सर्व मिळकतींची योग्य पद्धतीने पाहणी केल्यास 40 ते 50 कोटी रुपये जास्त उत्पन्‍न मिळू शकते. शाहूपुरी राजारामपुरी, ताराबाई पार्क आदी भागात सात ते आठ मिळकतीचे योग्य असेसमेंट केल्यास प्रत्येक मिळकतीचा कर 80 ते 90 लाख रुपये घरफाळा मिळ शकेल.