Thu, Nov 15, 2018 09:58होमपेज › Kolhapur › राजर्षी शाहू खर्‍या अर्थाने वंचितांचे मसीहा

राजर्षी शाहू खर्‍या अर्थाने वंचितांचे मसीहा

Published On: Feb 28 2018 1:16AM | Last Updated: Feb 27 2018 11:17PMकोल्हापूर : प्रतिनिधी

 स्वत:ला शेतकरी, कामगार आणि सैनिक यांच्यातीलच एक समजणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे खर्‍या अर्थाने वंचित, शोषित, गोरगरिबांचे मसीहा होते, असे प्रतिपादन धारवाडच्या कर्नाटक विद्यापीठाचे प्रा. डॉ. एस.टी. बागलकोटी यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाच्या वतीने ‘छत्रपती शाहू महाराज यांचे विचार व धोरण यांचे समकालीन औचित्य’ या विषयावर दोन दिवसीय चर्चासत्राच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बीजभाषक म्हणून बोलत होते. मानव्यविद्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील होते.

शाहू महाराज हे उच्चकोटीचे कृतिशील अर्थतज्ज्ञ होते, असे मत व्यक्‍त करून डॉ. बागलकोटी म्हणाले, शाहू महाराजांनी शेती, सिंचन, पायाभूत सुविधा विकास, रस्ते विकास, पणन-विपणन, लघु व मध्यम उद्योगांचा विकास आदी अनेक क्षेत्रांचा साकल्याने विचार व विकास केला. त्यामध्ये लोकसहभाग मिळविण्यासाठी प्रयत्न केले. उर्ध्वगामी प्रशासनाच्या प्रस्थापनेसाठी त्यांनी प्रयत्न केले. गावपंचायत व्यवस्थांची निर्मिती करून लोकांना स्व-प्रशासन देण्याची तयारी दाखविणारे ते एक सच्चे प्रशासक होते. त्यांच्या चरित्रापासून कृतिशीलता, अंगिकृत कार्याप्रती निष्ठा आणि समर्पण या गुणांचा आदर्श आजच्या राज्यकर्त्यांनी घेण्याची गरज आहे.

सहभागात्मक विकास, संसाधनांचे समन्यायी वाटप, शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधा विकासावर भरीव व नेमका खर्च, शेतीच्या वृद्धीला मदत, सामाजिक-आर्थिक विकासासाठी प्रयत्न, अंधश्रद्धा निर्मूलन आणि विद्वानांचा योग्य आदर याबाबी करण्यासाठी शाहू चरित्रापासून प्रेरणा घेण्याची गरज आहे. या देशाच्या विकासासाठी शाहूंचे विचार व कार्य आजही अत्यंत उपयुक्‍त आहेत, असे मत त्यांनी व्यक्‍त केले.

डॉ.  पाटील म्हणाले, जी व्यवस्था प्रत्येकाला रोजगार देऊ शकते, ती खर्‍या अर्थाने समावेशी स्वरूपाची असते, याची जाणीव ठेवून काम करण्याची गरज आहे. यावेळी  धिविभागप्रमुख डॉ. पी. एस. कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. व्ही. पी. कट्टी यांनी सूत्रसंचालन तर डॉ. एम. एस. देशमुख यांनी आभार मानले.  यावेळी डॉ. व्ही. बी. ककडे, डॉ. डी. सी. तळुले, डॉ. आर. जी. दंडगे, डॉ. एस. टी. कोंबडे, डॉ. एस. पी. पंचगल्‍ले  आदी उपस्थित होते.