Fri, Jul 19, 2019 16:15होमपेज › Kolhapur › रेशनिंगचा कोल्हापूर पॅटर्न राज्यभर

रेशनिंगचा कोल्हापूर पॅटर्न राज्यभर

Published On: Jul 01 2018 1:52AM | Last Updated: Jul 01 2018 1:20AMकोल्हापूर : प्रतिनिधी

सर्वसामान्यांना अन्न पुरविणे हे पुण्याचे काम आहे. कोल्हापूर जिल्ह्यात हे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरणात कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम राहिला. हे काम कोल्हापूर पॅटर्न म्हणून प्रसिद्ध झाले आहे. रेशनिंगमधील हा ‘कोल्हापूर पॅटर्न’ राज्यात राबवू, अशी घोषणा राज्याचे अन्न व नागरीपुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी केली. जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने आयोजित सन्मान मेळाव्यात ते बोलत होते. 

महासैनिक दरबार हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात धान्य दुकानदारांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे, त्याबाबत टप्प्याटप्याने निर्णय घेतले जातील, असे सांगत वसतिगृह आणि वृद्धाश्रमांना स्वस्त दरात धान्य देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

बापट म्हणाले, सामान्य माणूस हा केंद्र बिंदू मानून काम केले जात आहे. अन्नापासून एकही व्यक्ती राज्यात वंचित राहू नये, यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यातून अन्नधान्याची चोरी रोखण्यासाठी बायोमेट्रिक पद्धत विकसित केली असून, बायोमेट्रिक रेशनिंग बंद केले जाणार नाही. जिल्ह्याने रेशनकार्डाला आधारकार्डाच्या माध्यमाने जोडल्याने पात्र व्यक्तीपर्यंत धान्य प्रभावीपणे पोहोचवले जात आहे. जिल्ह्याच्या कामाची ही प्रगती राज्यासाठी दिशादर्शक आहे, असे सांगत बापट म्हणाले, शिक्षण क्षेत्रामध्ये ज्याप्रमाणे लातूर पॅटर्न आदर्श मानला जातो, त्याचप्रमाणे अन्नधान्य वितरणात आता कोल्हापूर पॅटर्न राज्यात आदर्श मानला जाईल. 

जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, राज्यामध्ये धान्य वितरणात पहिल्या पाच तालुक्यांत जिल्ह्यातीलच चार तालुक्यांचा समावेश असणे ही बाब जिल्हा प्रशासनासाठी गौरवास्पद आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे म्हणाले, जिल्ह्याने बायोमेट्रिक धान्य वितरण प्रणालीत  राज्यात प्रथम क्रमांक पटकावला, यामध्ये रेशनदुकानदारांचे बहुमोल सहकार्य लाभले. 

ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर्स फेडरेशनचे सहसचिव विश्‍वंभर बसू म्हणाले, ई-पॉस मशीनच्या वापराने दुकानदारांची जबाबदारी वाढली आहे.  प्रास्ताविक कॉ. चंद्रकांत यादव यांनी केले. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले. राजेश आंबुसकर यांनी आभार मानले. यावेळी रास्तभाव धान्य दुकानदार महासंघाचे राज्याध्यक्ष डी.एन.पाटील,  निलिमा धायगुडे,  संदीप देसाई, रवींद्र मोरे उपस्थित होते. तत्पूर्वी, ना. बापट यांनी सकाळी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले.