Tue, Jul 16, 2019 14:01



होमपेज › Kolhapur › जयंती नाला थेट पंचगंगेत

जयंती नाला थेट पंचगंगेत

Published On: Feb 13 2018 2:03AM | Last Updated: Feb 13 2018 1:49AM



कोल्हापूर : प्रतिनिधी

पंचगंगा नदीचे प्रदूषण करण्यात सर्वाधिक कारणीभूत ठरणारा जयंती नाला सोमवारी पुन्हा थेट पंचगंगेत मिसळत राहिला. वीजपुरवठा खंडित झाल्याने सांडपाण्यावर प्रक्रिया झाली नाही, यामुळे जयंती नाला ओव्हर फ्लो झाल्याचे सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील कर्मचार्‍यांनी सांगितले. प्रांताधिकार्‍यांनी पंचगंगा प्रदूषण रोखण्याचे आदेश यापूर्वी दिले आहेत, तरीही जयंती नाल्याची अशी अवस्था असल्याने महापालिका प्रदूषणाबाबत खरंच गंभीर आहे का, असा सवाल नागरिकांतून व्यक्‍त होत आहे.

पंचगंगा प्रदूषणाला जबाबदार धरून महापालिकेवर सी.आर.पी.सी. 133 नुसार फौजदारी कारवाईची मागणी प्रजासत्ताक सामाजिक संस्थेने केली होती. त्यावर करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्याकडे सुनावणी झाली होती. यानंतर प्रांताधिकार्‍यांनी दि. 22 जानेवारी रोजी पंचगंगा  नदीचे प्रदूषण रोखले नाही, तर कारवाई करण्याचा आदेश दिला. पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी कोणती कृती करावी, हेदेखील त्या आदेशात स्पष्ट केले आहे.दरम्यान, आज वीजपुरवठा खंडित झाल्याने जयंती नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया झाली नाही.

काहीवेळात नाला ओव्हर फ्लो झाला. यानंतर दुपारपासून जयंती नाल्याचे पाणी पंचगंगेत मिसळत राहिले. पंचगंगेत मिसळणार्‍या या पाण्यावर पावडर फवारणी करण्याचा केविलवाणा प्रयत्न कर्मचार्‍यांचा सुरू होता. मात्र, पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने कर्मचार्‍यांनी हा प्रयत्नही नंतर सोडून दिला. वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणी थेट मिसळत असल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले. जनरेटर आहे; पण कनेक्शन नाही वीजपुरवठा खंडित झाला, तर जनरेटर वापरला जातो. महापालिकेने या ठिकाणी जनरेटर आणून ठेवला आहे. मात्र, अद्याप त्याला कनेक्शन नसल्याने तो सुरू नसल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले. 

तत्काळ केला पंचनामा

जयंती नाल्याचे पाणी थेट पंचगंगेत मिसळत असल्याची बाब प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेच्या दिलीप देसाई यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिका अधिकार्‍यांसमवेत नदीत मिसळणार्‍या पाण्याचे नमुने घेत, घटनास्थळाचा पंचनामाही करण्यात आला. प्रांताधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशाचा हा पूर्णपणे भंग असल्याचा आरोप देसाई यांनी केला आहे.