Fri, Jul 19, 2019 07:35होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : 20 कारखान्यांना साखर जप्तीच्या नोटिसा

कोल्हापूर : 20 कारखान्यांना साखर जप्तीच्या नोटिसा

Published On: Jun 22 2018 2:08AM | Last Updated: Jun 22 2018 1:52AMकोल्हापूर ः प्रतिनिधी 

यावर्षी संपलेल्या साखर हंगामात अजूनही एफआरपीची रक्कम न दिलेल्या कोल्हापूर विभागातील 20 कारखान्यांना साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांनी साखर जप्तीच्या नोटिसा पाठवल्या आहेत. यात कोल्हापूर जिल्ह्यातील 11, तर सांगली जिल्ह्यातील 9 कारखान्यांचा समावेश आहे. 

ऊस नियंत्रण कायद्यानुसार तुटलेल्या उसाला पंधरा दिवसांत एफआरपीएवढी रक्कम देणे कारखान्यांना बंधनकारक आहे. यावर्षीचा हंगाम एप्रिलमध्ये संपला; पण अजूनही या 20 कारखान्यांकडे एफआरपीची सुमारे 149 कोटी रुपये थकीत आहेत. या कारखान्यांकडून 25 जूनपूर्वी ही रक्कम न दिल्यास साखर आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आंदोलन अंकुश संघटनेने दिला होता. त्याची दखल घेऊन साखर आयुक्तांनी येत्या दहा दिवसांत ही रक्कम न दिल्यास साखर जप्तीची कारवाई करण्याची नोटीस या कारखान्यांना बजावली आहे. नोटीस बजावलेल्या कारखान्यांत कोल्हापूर जिल्ह्यातील ईको-केन, राजाराम-बावडा, केन अ‍ॅग्रो, गुरुदत्त-शिरोळ, इंदिरा, कुंभी-कासारी, महाडिक शुगर्स, मंडलिक-हमीदवाडा, संताजी घोरपडे-कापशी व उदयसिंग गायकवाड कारखान्याचा, तर सांगली जिल्ह्यातील किसन अहिर, क्रांती-कुंडल, महाकाली, राजारापबापू-साखराळे व वाटेगाव, सद्गुरू, सोनहिरा-वांगी व विश्‍वास-शिराळा यांचा समावेश आहे.