होमपेज › Kolhapur › मोदी सरकारकडून महागाईत वाढ

मोदी सरकारकडून महागाईत वाढ

Published On: Feb 07 2018 2:19AM | Last Updated: Feb 07 2018 1:11AMकोल्हापूर : प्रतिनीधी

भाजपने निवडणूक प्रचारादरम्यान देशातील जनतेला दिलेली आश्‍वासने पूर्ण केलेली नाहीत. जी  कामे केल्याचे सांगत आहेत ती फसवी आहे.  महागाई कमी करतो असे सांगणार्‍या मोदी सरकारने महागाईत वाढ करणारे निर्णय घेतल्याचा आरोप करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 

मोर्चाचे नेतृत्व  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील, प्रदेशाध्यक्ष नविद मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले. सासने मैदान येथून मोर्चाला प्रारंभ होऊन ईपीजी ग्राऊंड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. 

यावेळी केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. संग्राम पाटील यांनी जनतेची  फसवणूक करणार्‍या सरकारला त्यांची योग्य जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे सांगितले. बेरोजगारी वाढत आहे, पण सरकार  1 कोटी बेरोजगारांना रोजगार दिल्याचा दावा करत आहे. सरकारने केंद्र व राज्यनिहाय ही आकडेवारी जाहीर करावी, असे आवाहन केले. 

नविद मुश्रीफ यांनी सरकारचे निर्णय जनताविरोधी असून भांडवलदार धार्जिने आहेत. शासनाच्या सर्व योजना फसव्या आहेत. डी.एड., बी.एड. झालेले हजारो तरुण बेरोजगार आहेत.  राज्यातील कौशल्य विकास योजनेच्या 7252 संस्था बंद पडल्या आहेत. तेथे काम करणारे 55 हजार कर्मचारी बेरोजगार झाले आहेत.  विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही, मोफत व सक्‍तीचे शिक्षण बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे.  पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसमुळे जनता हैराण झाली असून हा मोर्चा ‘इशारा मोर्चा’ असल्याचे त्यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष  रोहित पाटील,  आदिल फरास  यांचे भाषण झाले.  आंदोलनात  राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर,  आर. के. पोवार, अनिल साळोखे,  प्रसाद उगवे, रविराज सोनुले, अमोल माने, युवराज लाटकर, विकास पाटील, नितीन जांभळे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.