Thu, Apr 25, 2019 11:29होमपेज › Kolhapur › स्थायी सभापती : भाजपकडून राष्ट्रवादी पराभूत

स्थायी सभापती : भाजपकडून राष्ट्रवादी पराभूत

Published On: Feb 13 2018 2:03AM | Last Updated: Feb 13 2018 1:54AMकोल्हापूर ः प्रतिनिधी

कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत सोमवारी विरोधी भाजप-ताराराणी आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावत अनपेक्षितरीत्या  दे धक्‍का दिला. नाट्यमय घडामोडीत राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांना फोडून भाजपचे आशिष ढवळे हे सात विरुद्ध नऊ मतांनी विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या स्नुषा नगरसेविका मेघा आशिष पाटील यांना पराभवाचा धक्‍का सहन करावा लागला.  बंडखोरीतून काँग्रेस-राष्ट्रवादीतील नगरसेवकांची खदखद बाहेर पडली असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यासाठी पाटील यांचा पराभव हा मोठा धक्‍का मानला जात आहे.

महापालिकेच्या 41 व्या स्थायी सभापतिपदासाठी निवडणूक होती. त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून पाटील यांनी, तर विरोधी भाजप-ताराराणी आघाडीकडून ढवळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पीठासन अधिकारी कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकराला निवडणूक सुरू झाली. नगरसचिव दिवाकर कारंडे यांनी सभाध्यक्षांकडे अर्ज दिले. खेमनार यांनी दोन्ही अर्ज वैध असल्याचे सांगून माघारीसाठी 15 मिनिटांचा कालावधी दिला. या कालावधीत कोणीही माघार घेतली नसल्याने हात उंचावून मतदान घेण्यात आले.

पहिल्यांदा ढवळे यांच्यासाठी मतदान होऊन त्यांना राष्ट्रवादीच्या पिरजादे व चव्हाण यांच्यासह नऊ मते मिळाली. त्यानंतर पाटील यांच्यासाठी मतदान घेण्यात आल्यावर त्यांना सात मते मिळाली.
 परिणामी, खेमनार यांनी ढवळे हे सभापतिपदी विजयी झाल्याचे जाहीर केले.  त्यावेळी पाटील यांना अश्रू अनावर झाले होते. ढवळे हे माजी स्थायी सभापती आहेत. यापूर्वी त्यांनी 2010 मध्ये सभापतिपद भूषविले होते.  सत्ता काँग्रेसची अन् 

तिजोरीच्या चाव्या भाजपकडे महापालिका सभागृहासह सर्वच समित्यांत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. स्थायी समितीत काँग्रेसचे पाच, राष्ट्रवादीचे तीन सदस्य असून, शिवसेनेच्या एका सदस्याने त्यांना पाठिंबा दिला आहे. स्थायी समितीतील सत्ताधार्‍यांचे संख्याबळ नऊ आहे. विरोधी ताराराणी आघाडीचे चार, तर भाजपचे तीन सदस्य आहेत. त्यांची संख्या सात आहे. त्यामुळे स्थायी समितीत सत्ता काँग्रेस-राष्ट्रवादीची आणि आर्थिक नाडी म्हणजे सभापती भाजप-ताराराणी आघाडीचा असणार आहे. सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांचे महापालिकेचे वार्षिक बजेट आहे. सत्ता काँग्रेसची आणि तिजोरीच्या चाव्या भाजपकडे, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

परिवहन सभापतिपदी राहुल चव्हाण विजयी, महिला व बालकल्याण सभापतिपदी शहा परिवहन सभापतिपदासाठी शिवसेनेच्या राहुल चव्हाण यांच्याविरुद्ध ताराराणी आघाडीचे शेखर कुसाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. चव्हाण यांना सात, तर कुसाळे यांना सहा मते मिळाली. सभाध्यक्ष खेमनार यांनी परिवहन सभापतिपदी चव्हाण यांना विजयी घोषित केले. महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी काँग्रेसच्या सुरेखा शहा यांच्याविरुद्ध ताराराणी आघाडीच्या अर्चना पागर होत्या. शहा यांना पाच, तर पागर यांना चार मते मिळाल्याने शहा विजयी झाल्या. उपसभापतिपदाच्या निवडणुकीत ललिता बारामते यांना पराभूत करून काँग्रेसच्या छाया पोवार विजयी झाल्या. निवडणुकीनिमित्त महापालिका इमारतीला बंदोबस्तामुळे पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. 

मते मिळविण्यात सत्यजित कदम यांचा पुढाकार

मेघा पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या पदासाठी इच्छुक असलेले पिरजादे व चव्हाण यांनाही वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकी सहा महिने सभापतिपद देण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु, दोघेही एकमेकांच्या संपर्कात असल्याने नेत्यांनी व कारभार्‍यांनी केलेली दिशाभूल त्यांच्या लक्षात आली. परिणामी, दोघांनाही कोल्हापूर शहराच्या विकासासाठी भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले. त्यानुसार दोघांनीही मतदान केले, असे ताराराणी आघाडी गटनेते सत्यजित कदम यांनी सांगितले. अशाप्रकारे विजयी मते मिळविण्यात कदम यांनी पुढाकार घेतल्याचे सांगण्यात आले.
 

प्रा. जयंत पाटील यांच्या  अनुपस्थितीची चर्चा

स्थायी समिती निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून ज्येष्ठ नगरेसवक प्रा. जयंत पाटील यांनी कुठेच भाग घेतला नाही. मेघा पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते अर्ज भरणे किंवा सोमवारी निवडणुकीच्या दिवशीही महापालिकेत फिरकले नाहीत. न्यायालयीन कामानिमित्त ते मुंबईला गेल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या अनुपस्थितीची महापालिकेत चर्चा सुरू होती.

दै. ‘पुढारी’चे वृत्त खरे ठरले 

स्थायी समितीत राष्ट्रवादीच्या मेघा पाटील, अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण हे तीनच सदस्य आहेत. तिघांनीही नेत्यांकडे पदासाठी आग्रह धरला होता. ‘स्थायीसाठी चुरस अन् बंडखोरीची धास्ती’ असे वृत्त दै. ‘पुढारी’मध्ये  8 फेब्रुवारीला प्रसिद्ध झाले होते. त्यात चव्हाण यांनी सभापतिपदासाठी भरलेला उमेदवारी अर्जाचा फोटोही प्रसिद्ध करण्यात आला होता. पाटील यांना उमेदवारी जाहीर करून बंडखोरी थोपविण्यात नेत्यांना तात्पुरते यश आले. मात्र, पिरजादे व चव्हाण यांनी निवडणुकीत भाजप उमेदवाराला मतदान करून बंडखोरी केली.  दै. ‘पुढारी’ने दिलेले वृत्त खरे ठरले, अशी चर्चा मनपा वर्तुळात दिवसभर सुरू होती.