होमपेज › Kolhapur › गतवर्षीप्रमाणेच घरफाळा

गतवर्षीप्रमाणेच घरफाळा

Published On: Mar 20 2018 1:48AM | Last Updated: Mar 20 2018 1:40AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर महापालिका प्रशासनाने सादर केलेला घरफाळावाढीचा प्रस्ताव सोमवारी महासभेत प्रचंड गदारोळानंतर उपसूचनेसह मंजूर करण्यात आला. नगरसेवकांनी प्रस्तावाला कडाडून विरोध करून गेल्यावर्षीनुसारच घरफाळा आकारणी करण्यात यावी, अशी सूचनाही प्रशासनाला  केली. मागील वर्षानुसारच कर आकारणी आणि भाड्याने देण्यात येणार्‍या प्रॉपर्टींवरील घरफाळा  75 टक्क्यांवरून 25 टक्के इतका कमी करण्यासाठी येत्या चार दिवसांत उपसूचना देण्यात येईल, असेही सभागृहात सदस्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाड्याच्या प्रॉपर्टींवरील घरफाळा कमी होण्याची शक्यता आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर स्वाती यवलुजे होत्या.

शारंगधर देशमुख यांनी, प्रशासनाच्या प्रस्तावाला अनुसरून येत्या चार दिवसांत उपसूचना देऊ, असे सांगितले. गेल्यावर्षीनुसारच घरफाळा आकारणी करावी आणि शहरात भाड्याने दिल्या जाणार्‍या प्रॉपर्टींवरील घरफाळा राज्यात सर्वाधिक असल्याने तो कमी करण्यासाठी उपसूचना असेल, असे स्पष्ट केले. तसेच घरफाळ्याच्या दंड-व्याजात सवलत देऊन थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना केली. सत्यजित कदम यांनी, कोणत्याही स्थितीत शहरवासीयांवर घरफाळावाढ लादू देणार नसल्याचे स्पष्ट केले. विजय सूर्यवंशी यांनी, घरफाळावाढीपेक्षा 

थकबाकीवर भर देऊन उत्पन्‍नात वाढ करावी, अशी सूचना केली. सुनील कदम यांनी, राजारामपुरीतील एका शोरूमचा चुकीच्या पद्धतीने घरफाळा कमी केल्याचा आरोप केला. त्याची चौकशी करावी, त्यात तथ्य न आढळल्यास नगरसेवकपदाचा राजीनामा देऊ, असे सांगितले. अशोक जाधव यांनी, घरफाळ्यावर आकारण्यात येणारा वर्षाला 24 टक्के इतका दंड हा अन्याय करणारा असून, तो कमी करण्याची मागणी केली.

भूपाल शेटे यांनी, शहरातील अनेक प्रॉपर्टींना घरफाळा लागू नाही. मोबाईल टॉवरकडील कराकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक एटीएमला कर लागू केलेला नाही, याकडे लक्ष वेधले. शहरातील काही हॉटेलसाठी पाच खोल्यांची परवानगी असताना आता नव्याने दहा खोल्या वाढविला आहेत. त्यांच्या वाढीव इमारतीलाही घरफाळा लागू केलेला नाही. काही कर्मचारी चिरीमिरी घेऊन बाहेरच्या बाहेर सेटलमेंट करत असल्याचा आरोपही शेटे यांनी केला. तसेच घरफाळावाढ करण्याऐवजी मोठ्या थकबाकीदारांकडे वसुलीचा तगादा लावावा, अशी सूचना केली. शेखर कुसाळे, स्मिता माने, किरण नकाते, अशोक जाधव, तौफीक मुल्लाणी, अजित ठाणेकर, रूपाराणी निकम आदींनी चर्चेत भाग घेतला.
 

tags : Kolhapur,news, Municipal, property, tax,