होमपेज › Kolhapur › थकबाकीदारांचे गाळे करणार सील

थकबाकीदारांचे गाळे करणार सील

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 07 2018 12:29AM

बुकमार्क करा
कोल्हापूर ः प्रतिनिधी 

महापालिकेच्या मार्केटमधील गाळेधारकांबाबत काय धोरण ठरले आहे? असा प्रश्‍न स्थायी समिती सभेत सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर प्रशासनाच्या वतीने मुदत संपल्यानंतर त्यांना रेडीरेकनर दराने पैसे भरण्यास कळविले आहे. एक हजार गाळेधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. भाडे न भरलेल्या थकबाकीदारांचे दुकानगाळे सील करण्यात येत आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली. सभापती संदीप नेजदार यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. सत्यजित कदम, कविता माने, जयश्री चव्हाण, आशिष ढवळे, निलोफर आजरेकर, रिना कांबळे, मनीषा कुंभार आदींनी चर्चेत भाग घेतला. 

बायोमेट्रिक कार्ड असूनही विचारे कॉम्प्लेक्समध्ये मनपाने गाळा दिला आहे अशांना एकच लाभ द्या, त्यांचा गाळा किंवा बायोमेट्रिक कार्ड रद्द करा. तसेच ज्यांचे गाळाभाडे थकीत आहे किंवा महापालिकेची कोणतीही थकबाकी असेल त्यांना बायोमेट्रिक कार्ड देऊ नये, अशी सदस्यांनी सूचना केली. प्रशासनाच्या वतीने विचारे कॉम्प्लेक्समधील भाडे थकबाकीदारांचे गाळे सील केले आहेत. जे गाळेधारक पैसे भरणार नाहीत त्यांचे गाळे 81 ब अन्वये कारवाई करून महापालिकेच्या ताब्यात घेऊ. यासाठी स्वतंत्र बैठक घेऊ, असे स्पष्ट करण्यात आले. 

केएमटीचा मासिक पास दिवसातून किती वेळा चालतो? माझा मुलगा रोज केएमटीच्या पासवर प्रवास करतो. दोन महिने झाले त्यांच्या पासवर एकही पंचिंग झालेले नाही. असे काम असेल, तर केएमटी कशी फायद्यात येईल, अशी विचारणा कदम यांनी केली. प्रशासनाच्या वतीने दिवसातून एकवेळ येण्या-जाण्याचा पास आहे. संबंधितांना सूचना देऊ, असे सांगण्यात आले. पाणीपट्टीकडे वसुलीला ठोक मानधन कर्मचारी घेणार होता त्याचे काय झाले? गांधी मैदान येथील फिजिओथेरपी मशिनरी नादुरुस्त आहे. कर्मचारी कमी आहेत, अशी तक्रार सदस्यांनी केली. प्रशासनाच्या वतीने यापूर्वी कमी केलेले मीटररीडर पुन्हा घेण्याबाबतचा प्रस्ताव लेबर ऑफिसला सादर केला आहे. जादा फिजिओथेरपिस्ट भरण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे. मशीन दुरुस्तीचा प्रस्ताव दिला आहे, असे सांगण्यात आले.