होमपेज › Kolhapur › आरोग्य सेवेला महागाईचा डोस

आरोग्य सेवेला महागाईचा डोस

Published On: Jul 06 2018 1:32AM | Last Updated: Jul 05 2018 11:48PMकोल्हापूर : सतीश सरीकर   

कोल्हापूर महापालिकेची आरोग्य सेवा महागणार आहे. सावित्रीबाई फुले हॉस्पिटलसह पंचगंगा रुग्णालय, आयसोलेशन हॉस्पिटल व इतर वॉर्ड दवाखान्यांचा यात समावेश आहे. केसपेपर फी 5 रुपयांऐवजी 10 रुपये अशी दुप्पट केली आहे. तसेच एकूणच सेवांमध्ये 5 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यात एक्स-रे, सोनोग्राफीसह ईसीजी, फिजिओथेरेपी, रक्‍त तपासणीसह इतर सेवांचा समावेश आहे. त्यामुळे गरिबांना आता वैद्यकीय उपचारांसाठी थोडे जादा पैसे मोजावे लागणार आहेत. महिन्याला सुमारे दहा हजारांवर रुग्ण महापालिकेच्या आरोग्य सेवेचा लाभ घेतात. 

शहरात महापालिकेचे तीन हॉस्पिटल आहेत. यात सावित्रीबाई फुले हॉस्पिटल सर्वाधिक मोठे आहे. तब्बल 115 खाटांचे असलेल्या या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी, ऑपरेशन, लहान मुलांवर उपचार व स्त्री रोगासंदर्भात उपचार होतात. त्याबरोबरच शहरात ठिकठिकाणी वॉर्ड दवाखानेही आहेत. या ठिकाणी गोरगरीब रुग्णांवर अत्यंत माफक दरांत उपचार होतात. परंतु, गेल्या काही वर्षांत वैद्यकीय सेवांच्या म्हणजे सिरींजसह इतर किमतीत वाढ झाल्याने महापालिका प्रशासनाने थोड्या प्रमाणात वैद्यकीय सेवांत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पंचगंगा रुग्णालयात पहिल्या दोन प्रसूतींसाठी 250 रु. आकारण्यात येत होते. ती रक्‍कम तेवढीच ठेवली असून, तिसर्‍या प्रसूतीसाठी 600 ऐवजी 800 रु. घेतले जाणार आहेत. 

यापूर्वी हॉस्पिटलमध्ये 30 रुपये भरून दाखल होता येत होते. आता त्यात 10 रुपये वाढ करण्यात आली आहे. इतर सेवांसाठी आकारली जाणारी फी अशी ः कॉट भाडे प्रतिदिन - 40 रु., मेजर ऑपरेशन - 1350 रु. मेडियम ऑपरेशन - 660 रु. मायनर ऑपरेशन 170 रु. सुपर मेजर ऑपरेशन - 2750 रु. प्लॅस्टर - 35 रु. प्लॅस्टर व ड्रेसिंग मटेरियल 55 रु. ईसीजी - 60 रु. ई. सी. टी. - 60 रु., एक्स-रे 50 ते 90 रु. टी. टी. इंजेक्शन - 10 रु., अल्ट्रा सोनोग्राफी 370 ते 380  रु., रक्त तपासणी 30 ते 50 रु., फिजिओथेरेपी प्रत्येक अ‍ॅटमसाठी 50 रु., डेंटर ट्रीटमेंट 35 ते 50 रु. यासह इतर सर्व तपासण्यांमध्ये सुमारे 5 ते 10 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.