Wed, Apr 24, 2019 21:29होमपेज › Kolhapur › ...तरच अन्यायी घरफाळ्याचे होईल निर्मूलन

...तरच अन्यायी घरफाळ्याचे होईल निर्मूलन

Published On: Feb 16 2018 1:52AM | Last Updated: Feb 16 2018 12:28AMकोल्हापूर : राजेंद्र जोशी

कोल्हापूर महापालिकेच्या नव्या अर्थसंकल्पाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील व्यापारी मिळकतींच्या अन्याय्यी घरफाळ्याला बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने (क्रिडाई) वाचा फोडून एक जबाबदार सामाजिक भूमिका बजाविली आहे. 

हा अन्याय्यी घरफाळा शहराच्या विकासातील एक मोठा अडथळा बनून राहिला होता. यामुळे गेली काही वर्षे शहरात भांडवली मूल्यावर आधारित घरफाळा आकारणी सुरू झाल्यापासून नागरिकांवर होत असलेला अन्याय दूर करण्याची एक नामी संधी कोल्हापुरातील जबाबदार लोकप्रतिनिधींपुढे उभी आहे. त्यांनी याचा सखोल अभ्यास करून दि. 20 फेब्रुवारीपूर्वी कररचनेतील या मोठ्या बदलावर एकमत घडवून आणले, तर नव्या आर्थिक वर्षापासून नागिकांच्या मानेवर घट्ट होऊ पाहात असलेले अन्यायाचे जोखड दूर होऊ शकते.

महानगरपालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प मार्चच्या उत्तरार्धात सर्वसाधारण सभेपुढे सादर करण्यात येतो. प्रशासनाकडून स्थायी समितीकडे आणि स्थायी समितीकडून सर्वसाधारण सभेकडे असा या अर्थसंकल्पीय प्रस्तावाचा प्रवास असतो. तत्पूर्वी, महापालिकेच्या प्रशासनाला 20 फेब्रुवारीपूर्वी सभागृहाकडून करप्रस्तावाला मंजुरी घेणे आवश्यक असते. या मंजुरीनंतरच अर्थसंकल्पाचा आराखडा तयार करण्यात येतो.

शहराच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नावर क्रिडाईने घेतलेल्या भूमिकेचे खरे तर स्वागत करावयास हवे. कारण, या अन्याय्यी घरफाळ्याचा फटका शहरातील बांधकाम व्यावसायिकांना तर बसला आहेच; पण त्याशिवाय शहरातील तरुण उद्योजक भाडेप’व”्यावर जागा घेऊन आपला नवा व्यवसाय सुरू करू शकत नाहीत. तसेच स्वतःची जागा असूनही घरफाळ्याच्या भीतीपोटी नागरिकांना व्यवसाय सुरू करण्याचे धाडस होत नाही, अशी अवस्था आहे. शहरामध्ये उपनगराचा विस्तार मोठा झाला. तसे उपनगरांतील मोठ्या रस्त्यांवर बांधकाम व्यावसायिकांनी निवासी व व्यापारी, असे संमिश्र प्रकल्प उभे केले. 

या प्रकल्पात आजवर गुंतवणूकदार व्यापारी जागांसाठी गुंतवणूक करत होते; पण मिळालेल्या भाड्यापैकी 73 टक्के भाडे महापालिकेला घरफाळ्याच्या रूपाने जाऊ लागल्याने महापालिकेच्या या बिनभांडवली धंद्याला गुंतवणूकदार वैतागले आणि परिणामी, शहरातील बांधकाम केलेले 10 हजार व्यापारी आस्थापनांच्या जागा विनाविक्री मोकळे पडून व्यवसाय अडचणीत आले आहेत. या सर्वाचा कोल्हापूरच्या प्रगतीवर मोठा परिणाम होतो आहे. यामुळेच क्रिडाईच्या प्रतिनिधींनी प्रथम पालकमंत्र्यांना साकडे घालून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना हा विषय समाजावून सांगण्याची मोहीम हाती घेतली.  एकदा नेते तयार झाले, की सभागृह तयार होण्यास वेळ लागत नाही. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पुढाकार घेऊन मार्ग काढला, तर कोल्हापूरचे प्रगतीचे अडकलेले चक्र गतिमान होऊ शकते.

पक्षीय मतभेद ठेवा बाजूला
कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींना आपले राजकीय मतभेदाचे अंगरखे दूर काढून ठेवून कररचना बदलण्यासाठी कंबर कसावी लागेल. अन्यथा, सभागृहावर निर्णय सोडून लोकप्रतिनिधींनी आपल्या हाताची घडी घालण्याची भूमिका घेतली, तर महसुलाच्या तुटीचे कारण दाखवून ही अन्याय्यी घरफाळा पद्धत तशीच चालू राहण्याचा धोका आहे.