Tue, May 26, 2020 22:17होमपेज › Kolhapur › तिरडी मोर्चावरून मनपा सभेत बोंबाबोंब

तिरडी मोर्चावरून मनपा सभेत बोंबाबोंब

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

प्रतीकात्मक तिरडी मोर्चावरून कोल्हापूर महापालिकेत बुधवारी बोंबाबोंब झाली. महासभा सुरू असतानाच तिरडी थेट सभागृहात आणण्याचा प्रयत्न झाला. त्यावरून सत्ताधारी राष्ट्रवादीचे नगरसेवक व शिपाई यांच्यात हमरीतुमरी झाली. पंचगंगा स्मशानभूमीचा विस्तार होत नसल्याने महापौर आसनावर आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांच्यासमोर शितोंडी (लोटकं) ठेवून प्रशासनाला जाब विचारण्यात आला. परंतु, विरोधकांनी स्टंटबाजीचा आरोप केल्याने सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि विरोधी भाजप-ताराराणी आघाडी यांच्यात प्रचंड गोंधळ झाला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर अर्जुन माने होते.

पंचगंगा स्मशानभूमी अपुरी पडू लागल्याने त्याचा विस्तार करावा, यासाठी काही महिन्यांपूर्वी ठराव झाला आहे. तरीही त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे नगरसेवक अफजल पिरजादे, मुरलीधर जाधव, सुनील पाटील, सचिन पाटील, प्रकाश गवंडी, अश्फाक आजरेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी महापालिकेवर प्रतीकात्मक तिरडी मोर्चा काढला. मुख्य प्रवेशद्वारातून थेट सभागृहापर्यंत तिरडी आणण्यात आली. सभागृहात तिरडी आणताना शिपायांनी तीव्र विरोध केल्याने हमरीतुमरी झाली. अखेर महापौर माने यांच्या आदेशावरून शिपायांनी सभागृहात तिरडी आणण्याचा डाव हाणून पाडला. परंतु, पिरजादे हे शितोंडी घेऊन सभागृहात आले. महापौर आसनावर शितोंडी ठेवून प्रशासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

किरण नकाते यांनी, सत्ता तुमची... महापौर तुमचा... बजेट करणार तुम्ही... निधी तुमच्याच हातात... तरीसुद्धा ही स्टंटबाजी का? असा टोला लगावला. त्यावरून बोंबाबोंब सुरू झाली. शारंगधर देशमुख यांनी, पालकमंत्री तुमचे असूनही शहरासाठी निधी मिळत नाही. काय उपयोग मंत्रिपदाचा? तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असे सुनावले. सत्यजित कदम यांनी, ‘अमृत’ योजनेतून दोनशे कोटी निधी दिला. आणखी वेगवेगळ्या योजनेतून कोट्यवधींचा निधी दिल्याचे सांगून पालकमंत्र्यांनीच टोल घालवल्याचे सांगितले. मुरलीधर जाधव यांनी, टोल घालवला कुठे? वसुलीसाठी पत्र आल्याचे सांगितले. त्यावर कदम यांनी पत्र दाखवा मगच बोला, असे सुनावले. यावेळी विरोधकांनी ‘बंद करा, बंद करा... स्टंटबाजी बंद करा...’,अशा घोषणा दिल्या. त्यानंतर सत्ताधारी व विरोधक सर्वच उभे राहून सुमारे अर्धा तास गोंधळ घालत होते. कोण काय बोलतेय, कुणालाच कळत नव्हते. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात होते.

त्यानंतर कदम यांनी, स्मशानभूमीचा विस्तार झालाच पाहिजे. परंतु, आंदोलनाची ही पद्धत चुकीची असल्याचे सांगितले. देशमुख यांनी, ही स्टंटबाजी नसून झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जाग आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले. पिरजादे यांनी, यात राजकारण व सत्ताधारी असा विषय नाही. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी वेटिंग सुरू असल्याने गंभीर प्रश्‍न बनला आहे. त्याविषयी वारंवार प्रशासनाकडे लक्ष वेधूनही दुर्लक्ष होत असल्याने असे आंदोलन केल्याचे सांगितले. कदम यांनी, वस्तुस्थिती खरी असून प्रशासनाने कामाचा डीपीआर केला काय? अशी विचारणा केली. तसेच कामासाठी भाजप-ताराराणी आघाडीचा निधी वापरावा, असे जाहीर केले. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी विस्तारीकरणाचा प्रस्ताव असल्याचे सांगून संबंधित जागा शाहू छत्रपती व अन्य शेतकर्‍यांची असल्याचे स्पष्ट केले.

विजय सूर्यवंशी यांनी, लोकभावना तीव्र असल्याचे सांगून झोन बदलाचा प्रस्ताव कुठे आहे? डिझेल दाहिनीचे काय झाले, असे प्रश्‍न विचारले. नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत यांनी, 16 जूनला प्रस्ताव मंजूर झाल्याचे सांगितले. त्यावरून पुन्हा नगरसेवकांनी प्रशासनला मग पाच महिने काय केले, असा जाब विचारला. मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांनी दोन दिवसांत डिझेल दाहिनीचे साहित्य येईल. त्यानंतर महिन्यात दाहिनी सुरू होईल, असे स्पष्ट केले.

आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांनी, प्रोजेक्ट विभागाला नकाशा करण्याचे आदेश दिले असून त्यानंतरच डीपीआर तयार केला जाईल. त्यानुसार जागेसाठी झोन बदलाचा प्रस्ताव तयार करू, असे सांगितले. उमा बनछोडे यांनी, लिंगायत दफनभूमीसाठीही कर्मचारी पुरवून भिंत बांधण्यासाठी निधी द्यावा, अशी मागणी केली. नकाते यांनी, शववाहिकेचा प्रश्‍न उपस्थित केला. महापौर माने यांनी, सर्वधर्मीयांच्या स्मशानभूमी व दफनभूमी सुधारणा व विस्तारीकरणासाठी तातडीने समिती नेमण्यात यावी. लोकसहभागातून विकासकामे करावीत, अशा सूचना दिल्या. शेखर कुसाळे, तौफिक मुल्लाणी, अभिजित चव्हाण यांनी चर्चेत भाग घेतला.