Sat, Apr 20, 2019 08:21होमपेज › Kolhapur › शिवसेनेचा हाबकी डाव; काय होईल? या चिंतेत काँग्रेस

भाजपला ‘बूमरँग’ची धास्ती!

Published On: May 22 2018 1:25AM | Last Updated: May 22 2018 12:20AMकोल्हापूर : सतीश सरीकर

महापौर निवडीविषयी महापालिकेत कोणतीही चर्चा नसताना दस्तुरखुद्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपचाच महापौर होईल, असे जाहीर केले. कोल्हापूरच्या महापौर निवडणुकीनंतरच जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदल करू, असेही सांगितले. परंतु, अचानक महापालिकेत मित्रपक्ष असलेल्या ताराराणी आघाडीला महापौरपदाची उमेदवारी देण्यात आली. परिणामी, भाजपने ‘बूमरँग’ची धास्ती घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच उमेदवारी अर्ज दाखल करून शिवसेनेने ‘हाबकी डाव’ टाकल्याचे सांगण्यात येते. तर महापौर निवडणुकीला नाट्यमय वळण मिळू लागल्याने काय होईल? या चिंतेत काँग्रेस पडली आहे. 

कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आहे. जिल्ह्यातील नगरपालिका व पंचायत समित्यांवरही भाजपने सत्ता मिळवून झेंडा फडकावला आहे. फक्‍त जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेल्या कोल्हापूर महापालिकेवर भाजपची सत्ता नाही. त्यामुळे महापालिकेची निवडणूक झाल्यापासून आता अडीच वर्षे झाली तरीही पालकमंत्री पाटील हे महापालिकेवर भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी महापालिकेतील नगरसेवकांना काहीही ‘चमत्कार’ करा आणि महापालिकेवर सत्ता आणा, असेही सांगितले होते. स्थायी समिती सभापती निवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी करून काहीअंशी त्यांना त्यात यशही मिळाले. परंतु, महापालिकेत सत्तांतर घडलेले नाही. 

महापौरपदावर सर्वसाधारण महिला प्रवर्ग (ओपन) असे आरक्षण आहे. यापुढे तब्बल अडीच वर्षांसाठी हे आरक्षण असणार आहे. परिणामी, एकदाच लढायचे आणि महापौरपद मिळवायचे. त्यानंतर अडीच वर्षे एकाकडेच महापौरपद ठेवून महापालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात आणायची, अशी खेळी होती. त्यानुसार भाजपची वाटचालही सुरू होती. मात्र, अचानक भाजपने घुमजाव केले. थेट ताराराणी आघाडीला उमेदवारी बहाल केली. त्यामुळे भाजप नगरसेवकांत प्रचंड असंतोष पसरला. रविवारी (दि. 20) भाजप-ताराराणी आघाडीच्या पार्टी मिटिंगमध्ये एका नगरसेविकेच्या पतीने कारभार्‍यांना जाब विचारला. ताराराणी आघाडीलाच उमेदवारी द्यायची होती, तर आम्हाला तयारी करायला कशाला सांगितले?  अशी विचारणा केली. 

भाजप-ताराराणी आघाडीच्या कारभार्‍यांनी भाजपचाच महापौर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली केल्या होत्या. वेगवेगळ्या ‘खेळी’ केल्याने राष्ट्रवादीतील काही असंतुष्ट नगरसेवक त्यांच्या गळाला लागले होते. शिवसेनेतील तीन नगरसेवकही त्यांना सहकार्य करण्याच्या तयारीत होते, अशी चर्चा होती. अशाप्रकारे भाजपला यशही येत होते. परंतु, सत्ताधारी काँग्रेसला त्याची कुणकुण लागली. काँग्रेसच्या कारभार्‍यांनीही हात-पाय हालविले. काँग्रेसनेही भाजपचीच खेळी अवलंबली. भाजप-ताराराणी आघाडीतील नाराज नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात आले. परिणामी, आपण त्यांचे आठ फोडले आणि त्यांनीही आपले आठ फोडले, तरीही आपला विजय नक्‍की नसल्याची जाणीव भाजपच्या कारभार्‍यांना झाल्याची चर्चा आहे. परिणामी, ‘कोटीची उड्डाणे’ देऊनही पदरात विजय पडत नसला तर काय उपयोग? अशी चर्चा झाली. अशाप्रकारे भाजपने ‘बूमरँग’ची धास्ती घेऊनच ताराराणी आघाडीच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असली, तरी त्यांच्याकडे काटावरचे बहुमत आहे. सद्यस्थितीत महापालिकेत सत्ताधारी व विरोधी भाजप-ताराराणी आघाडी यांच्यात टोकाचे राजकारण व ईर्ष्या सुरू आहे. त्यामुळे सत्ता टिकविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेबरोबर हातमिळवणी करत सत्तेत सहभागी करून घेतले आहे. परंतु, स्थायी सभापती निवडणुकीत शिवसेनेचा नगरसेवक काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत करतो. त्याच्या बदल्यात काँग्रेस-राष्ट्रवादीने परिवहन सभापतिपद दिले असल्याचे शिवसेना नगरसेवकांचे मत आहे. महापौरपदासाठी वेगळे ‘गणित’ मांडायला पाहिजे, असेही शिवसेना नगरसेवक सांगत आहेत. त्यामुळेच उमेदवारी अर्ज भरल्याचे सांगण्यात येते. परिणामी, पदासाठी शिवसेनेने ‘हाबकी डाव’ टाकल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. 

नाट्यपूर्ण वळण

महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्पष्ट बहुमत आहे. परंतु, स्थायी सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक फुटले होते. त्यांच्यावर राष्ट्रवादीतून अपात्रतेसाठी कारवाई करण्यात आली आहे. त्यातच आतापर्यंत सोबत असलेल्या शिवसेनेने अचानक महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीला नाट्यमळ वळण लागले आहे. भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवारांनी ऐन मतदानादिवशी अर्ज माघार घेऊन शिवसेनेला पाठिंबा दिल्यास काहीही होई शकते? असे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानादिवशी काय होईल? या चितेंत काँग्रेस पडली आहे.