Thu, Apr 25, 2019 07:32होमपेज › Kolhapur › महापौरपद; शिवसेना तटस्थ काँग्रेसचा विजय निश्‍चित

महापौरपद; शिवसेना तटस्थ काँग्रेसचा विजय निश्‍चित

Published On: May 25 2018 1:09AM | Last Updated: May 25 2018 12:17AMकोल्हापूर : प्रतिनिधी

अत्यंत चुरशीच्या बनलेल्या कोल्हापूरच्या महापौरपदाच्या निवडणुकीत ‘तटस्थ’ राहण्याचा निर्णय शिवसेनेने गुरुवारी रात्री घेतला. निवडणुकीला ‘कलाटणी’ देणारा हा निर्णय असल्याने काँग्रेसच्या ‘विजयाचा मार्ग सोपा’ झाला. मुळातच बहुमत असल्याने काँग्रेसच्या सौ. शोभा पंडितराव बोंद्रे यांचे महापौरपद ‘फायनल’ झाले. निवडणुकीच्या रिंगणातून शिवसेनेच्या सौ. प्रतिज्ञा महेश उत्तुरे उमेदवारी अर्ज माघार घेतील. त्यानंतर ताराराणी आघाडीच्या सौ. रूपाराणी संग्राम निकम व बोंद्रे यांच्यात लढत होऊन शुक्रवारी सकाळी फक्‍त निवडणुकीची आौपचारिकता पार पडेल.

कोल्हापूर महापालिकेत 44 नगरसेवक असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. काठावरचे बहुमत असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेतले आहे. शिवसेनेला परिवहन समिती सभापतिपद दिले आहे. विरोधात असलेल्या भाजप-ताराराणी आघाडीकडे 33 इतके संख्याबळ आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस, ताराराणी आघाडी व शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत असलेल्या शिवसेनेने निवडणुकीत उडी घेतल्याने 

तिरंगी लढत होऊन रंगत येईल, अशी चर्चा होती. तसेच गुरुवारी दुपारपर्यंत शिवसेनेच्या उमेदवारीविषयी कोणताही निर्णय न झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू होती. शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, आ. राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेना तटस्थ राहील, असे फोनवरून सांगितले. शिवसेनेच्या उत्तुरे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आणि चारही नगरसेवकांना निवडणुकीत तटस्थ राहण्याच्या सूचना दिल्याचेही स्पष्ट केले.

शिवसेनेच्या भूमिकेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. आता निवडणुकीची औपचारिकता बाकी राहिली आहे. ताराराणी आघाडीचे उमेदवार निकम यांच्याविरुद्ध बोंद्रे यांची लढत होईल. शिवसेना तटस्थ राहणार असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पारड्यातील 44 मते बोंद्रे यांना विजयी करतील. निकम यांना भाजप-ताराराणी आघाडीच्या 33 मतांवर समाधान मानावे लागेल. उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीचे महेश सावंत, भाजपचे कमलाकर भोपळे व शिवसेनेचे अभिजित चव्हाण यांनी अर्ज भरले आहेत. त्यापैकी चव्हाण हे माघार घेणार असल्याने सावंत व भोपळे यांच्यात लढत होईल. काँग्रेस-राष्ट्रवादीकडे 44 मते असल्याने साहजिकच सावंत यांचा विजय निश्‍चित मानला जातो.

महापौर, उपमहापौर पदासाठी शुक्रवारी निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पीठासन अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजल्यापासून निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. त्यासाठी महापालिका प्रशासनाने सर्वतोपरी खबरदारी घेतली आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसह महापालिकेबाहेरही सीसीटीव्ही कॅमेर्‍याची नजर असणार आहे. नगरसेवकांनाही ओळखपत्र दाखवूनच आत सोडले जाणार आहे. सभागृहात व मुख्य गेटसमोर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. तसेच मतदान प्रक्रियेचे व्हिडीओ शूटिंगही करण्यात येणार आहे. महापालिका सभागृहाबाहेर व गेटसमोर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.

महापालिकेचे नगरसचिव दिवाकर कारंडे, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ व लक्ष्मीपुरी ठाण्याचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांची महापालिकेत संयुक्‍त बैठक झाली. यावेळी एकूणच निवडणूक प्रक्रिया व बंदोबस्ताचा आढावा घेण्यात आला. निवडणूक अत्यंत संवेदनशील बनली असल्याने कर्मचार्‍यांनाही ओळखपत्राशिवाय महापालिकेत येऊ न देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. सभेसाठी नागरिकांना नो एंट्री असणार आहे. महापालिका चौकात कुणाचेही वाहन सोडले जाणार नाही. पार्किंगची व्यवस्था महापालिकेच्या मुख्य गेटसमोर रस्त्यावर करण्यात येणार आहे.