Mon, May 20, 2019 20:07होमपेज › Kolhapur › फोडाफोडी की फुसका बार!

फोडाफोडी की फुसका बार!

Published On: May 25 2018 1:09AM | Last Updated: May 24 2018 10:32PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापूर महापौरपदाच्या निवडणुकीत अत्यंत चुरस निर्माण झाली आहे. गेले काही दिवस घोडेबाजाराची चर्चा रंगली आहे. सर्वच पक्षांत ‘असंतुष्ट’ व ‘कारभार्‍यां’विषयी नाराजी आहे. त्यातून नगरसेवक फुटण्याची भाषा केली जात आहे. सत्ताधार्‍यांना गाफील ठेवून ‘डाव’ साधण्यात येणार असल्याचे सांगत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. शुक्रवारी मतदानापर्यंत शिवसेनेसाठी सर्व पर्याय खुले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नेमके काय होणार... ‘फोडाफोडी’ की काहीही न करता विरोधकांचा ‘फुसका बार’ ठरणार.... अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. कोण ‘माघार’ घेणार अन् ‘जिंकणार’ कोण? अशी चर्चा रंगली आहे. 

कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे; परंतु काठावरचे बहुमत असल्याने विरोधकांशी ‘संधान’ बांधू नये यासाठी शिवसेनेलाही काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्तेत सहभागी करून घेतले आहे. शिवसेनेला परिवहन समिती सभापतिपद दिले आहे; परंतु स्थायी समितीत सत्ता टिकविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला शिवसेनेची गरज भासते. स्थायी सभापती निवडणुकीत सहकार्य करण्यासाठीच काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला परिवहन सभापतिपद दिल्याचे नगरसेवकांचे मत आहे. त्यामुळे महापौर, उपमहापौर निवडणुकीत कोणालाही मतदान करण्यासाठी आम्ही ‘बांधिल’ नसून स्वतंत्र असल्याचे शिवसेनेचे नगरसेवक सांगत आहेत. त्यामुळेच शिवसेनेने पहिल्यांदाच महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत थेट उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 

गेल्या दीड महिन्यापासून पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे भाजपचाच महापौर होणार असे म्हणत होते. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत रंगत भरली होती; परंतु ऐनवेळी भाजपने ‘घूमजाव’ करून मित्रपक्ष असलेल्या ताराराणी आघाडीला उमेदवारी दिली. परिणामी दीड महिन्यापासून आम्ही निवडणुकीची तयारी केली होती, असे सांगून भाजपमधील इच्छुक नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली होती. आता ताराराणी आघाडीला उमेदवारी मिळाल्याने आघाडीचे सर्वेसर्वा माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडून जोरदार हालचाली सुरू झाल्याची चर्चा होती. शिवसेनेच्या चार नगरसेवकांचा पाठिंबा मिळवत आणि राष्ट्रवादीला पुन्हा खिंडार पाडून ताराराणीचा महापौर करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्या बदल्यात शिवसेनेला उपमहापौरपद द्यायचे अशीही चर्चा आहे.  

बहुमताच्या जोरावर काँग्रेसचा महापौर होण्यासाठी कोणताही धोका नाही; परंतु स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत दगाफटका झाल्याने काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील हे ‘रिस्क’ घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रत्येक नगरसेवकांशी ते संपर्क साधून आहे. स्थायी सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपला मतदान केलेल्या राष्ट्रवादीचे अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण यांच्याशीही त्यांनी संपर्क साधून काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करण्याविषयी सांगितले आहे. शिवसेना पूर्वीप्रमाणेच काँग्रेस-राष्ट्रवादीला निवडणुकीत मदत करेल, असे सांगितले जात आहे; परंतु शिवसेनेने अद्याप ‘पत्ते खुले’ केले नसून सर्व पर्याय असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सहलीवरील नगरसेवक आज कोल्हापुरात

कोणताही दगाफटका नको म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना 20 मेपासून गोव्याला नेण्यात आले आहे. गुरुवारी रात्री ते गोव्यातून बाहेर पडले. बेळगावात रात्री थांबून शुक्रवारी सकाळी कोल्हापुरात येणार आहेत. भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवक बुधवारी तिलारीला गेले आहेत. शुक्रवारी सकाळी ते बाहेर पडणार असून थेट महापौर निवडणुकीला येणार आहेत. शिवसेनेचे नगरसेवक पुण्यात होते. बुधवारी रात्री कोल्हापुरात आले.

शिवसेनेचा निर्णय आज निवडणुकीपूर्वीच...

सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी व विरोधी भाजप-ताराराणी आघाडी यांच्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतपत नगरसेवकांचा फरक आहे. त्यामुळे सुरुवातीला शिवसेनेचे चार नगरसेवक किंगमेकरच्या भूमिकेत होते; परंतु आता महापालिका निवडणूक होऊन अडीच वर्षे उलटल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचे कारभारी शिवसेना नगरसेवकांना फार ‘किंमत’ देत नाहीत. त्यामुळेच शिवसेनेने निवडणुकीत उडी घेतली आहे. महापौर, उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी निवडणूक लढवायची की माघार घ्यायची याचा सर्वस्वी निर्णय ’मातोश्री’वरून येणार्‍या आदेशावर अवलंबून असल्याचे सांगितले जात आहे. 

पिरजादे, चव्हाण काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत

स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत उमेदवारी डावलल्याने राष्ट्रवादीचे नगरसेवक अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण यांनी ‘बंडखोरी’ करून भाजपला मतदान केले होते. त्यामुळे महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीतील त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तो राग फक्‍त स्थायी सभापतिपद निवडणुकीपुरता होता, असे दोघेही सांगत होते. तसेच दोन दिवसांपूर्वी पिरजादे यांनी महापौर निवडणुकीत काँग्रेसला मतदान करणार असल्याचे सांगितले. चव्हाण यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे महापौर, उपमहापौरपदाचे उमेदवार शिवाजी पेठेतील असल्याने त्यांना मतदान करणार असल्याचे जाहीर केले होते. शिवसेनेचे चार व हे दोन विरोधकांना मिळाल्यास राष्ट्रवादीतील आणखी दोन नगरसेवक फोडून ताराराणी आघाडीचा महापौर होऊ शकतो, अशी चर्चा होती. त्यामुळे पिरजादे व चव्हाण यांच्या भूमिकेला महत्त्व होते. शोभा बोंद्रे व महेश सावंत हे पेठेतील असल्यानेच दोघांनीही त्यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला.