होमपेज › Kolhapur › कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा : ‘एअर डेक्‍कन’ची सहा दिवसांसाठी मागणी?

कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा : ‘एअर डेक्‍कन’ची सहा दिवसांसाठी मागणी?

Published On: Jul 24 2018 1:32AM | Last Updated: Jul 24 2018 1:15AMकोल्हापूर : प्रतिनिधी

आठवड्यातून तीन दिवस सुरू असलेली कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा सुरळीत ठेवता न आलेल्या एअर डेक्‍कनने आता सहाही दिवस सेवा सुरू करण्याची परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. यासह कोल्हापूर-मुंबई या मार्गासाठी इंडिगो कंपनीही इच्छुक असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

सहा वर्षांनंतर केंद्र शासनाच्या उडान योजनेंतर्गत कोल्हापूर-मुंबई मार्गावर एअर डेक्‍कनची सेवा सुरू झाली. आठवड्यातून तीन दिवस असणारी ही सेवा दोनच महिने सुरू राहिली. पुरेसे प्रवासी उपलब्ध असतानाही तांत्रिक कारण पुढे करत महिन्याभरापासून कंपनीने सेवा बंद केली आहे. ही सेवा पूर्ववत सुरू करण्याबाबत सर्वच स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. कंपनीकडून दरवेळी नवा मुहूर्त सांगण्यात येत असल्याने या कंपनीला काळ्या यादीत टाका आणि त्यांची सेवा खंडित करून ती अन्य कंपनीला द्या, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केंद्र शासनाकडे केली आहे.

यासर्व पार्श्‍वभूमीवर आहे ती सेवा सुरू ठेवण्याऐवजी आठवड्यातून सहा दिवसांसाठी परवानगी मिळावी याकरिता कंपनीचे प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले कोल्हापूर-तिरूपती, कोल्हापूर-हैदराबाद मार्गावर लवकरच विमानसेवा सुरू होणार आहे. याबरोबर कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानसेवाही पूर्ववत व्हावी याकरिता जिल्हा प्रशासनाचेही प्रयत्न सुरू आहेत. याबाबत येत्या दोन-तीन दिवसांत बैठक होणार असल्याचेही सांगण्यात आले.