Thu, Apr 18, 2019 16:06होमपेज › Kolhapur › खंडपीठ प्रश्‍नी उद्या मुंबईत बैठक

खंडपीठ प्रश्‍नी उद्या मुंबईत बैठक

Published On: Feb 13 2018 2:03AM | Last Updated: Feb 13 2018 1:28AMकोल्हापूर: प्रतिनिधी

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे या मागणीसाठी बुधवारी (दि.14) मुंबईत बैठक होणार आहे. ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी.पाटील, दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक  डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठ कृती समितीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात दुपारी दोन वाजता  बैठक होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरला व्हावे या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी कोल्हापूर खंडपीठ व्हावे याबाबत सकारात्मक अहवाल दिला आहे.

राज्य सरकारनेही खंडपीठाच्या स्थापनेसाठी पायाभूत सुविधांसाठी निधी देण्याची तयारी यापूर्वीच दर्शविली आहे. यासर्व पार्श्‍वभूमीवर खंडपीठ कोल्हापुरातच व्हावे, असा राज्य मंत्रिमंडळाचा स्वयंस्पष्ट ठराव आवश्यक आहे. हा ठराव तत्काळ द्यावा, या मागणीसाठी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक होत आहे. दरम्यान, या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांची शाहू सभागृहात बैठक झाली. या बैठकीत आढावा घेण्यात आला.

मुख्यमंत्र्यांसमवेत होत असलेल्या बैठकीत जो निर्णय होईल, त्या निर्णयानंतर कृती समितीची भूमिका काय असावी, याबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली. खंडपीठासाठी मुख्यमंत्र्यासमवेत होत असलेल्या बैठकीत कृती समितीच्या वतीने ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील व दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव हे चर्चा करतील, असेही यावेळी सांगण्यात आले. या बैठकीला बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत शिंदे, उपाध्यक्ष अ‍ॅड. नारायण भांदिगरे, सचिव अ‍ॅड. किरण पाटील, अ‍ॅड. विक्रम झिटे, अ‍ॅड. रोहन पाटोळे, अ‍ॅड. संग्राम पाटील, अ‍ॅड. दीप्ती घाटगे, अ‍ॅड. सतीश कुंभार आदी उपस्थित होते.