Fri, Jun 05, 2020 22:01होमपेज › Kolhapur › कोल्हापूर-मुंबईचे रविवारी टेकऑफ

कोल्हापूर-मुंबईचे रविवारी टेकऑफ

Published On: Dec 20 2017 1:55AM | Last Updated: Dec 20 2017 1:29AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर-मुंबई प्रवासी विमानसेवेला रविवारी (दि. 24) प्रारंभ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर ही सेवा देणार्‍या एअर डेक्‍कन कंपनीच्या विमानाची तांत्रिक चाचणी उद्या, बुधवारी घेतली जाणार आहे. याबरोबरच विमानतळाची पाहणीही केली जाणार आहे. विमानसेवेसाठी गुरुवार, दि. 21 पासून तिकीट बुकिंग सुरू केले जाणार आहे.

गेल्या सहा वर्षांपासून बंद असलेली प्रवासी विमानसेवा पुन्हा सुरू होत आहे. केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेंतर्गत कोल्हापूर-मुंबई अशी सेवा सुरू होणार आहे. दर मंगळवार, बुधवार आणि रविवार अशी आठवड्यातून तीन दिवस ही विमानसेवा उपलब्ध होणार आहे. दुपारी 1.15 वाजता मुंबईहून विमानाचे टेकऑफ होईल. दुपारी 2.30 वाजता कोल्हापुरात लँडिंग होणार आहे. यानंतर कोल्हापुरातून दुपारी 3.25 वाजता विमानाचे टेकऑफ होणार असून, मुंबईत 4.40 वाजता विमान पोहोचणार आहे.

या विमानसेवेसाठी 17 अथवा 20 सीटर विमान वापरले जाणार आहे. ‘उडान’ योजनेंतर्गत स्वस्तात विमान प्रवास करता येणार आहे. विमानाची गैरसोयीची वेळ असली, तरी अनेकांनी विमान तिकीट बुकिंग करण्याचे नियोजन केले आहे. यामुळे पहिल्या काही फेर्‍या फुल्ल होण्याची शक्यता आहे. विमानसेवेसाठी विमानतळाला डे ऑपरेशन परवाना मिळाला आहे. त्याकरिता धावपट्टीची दुरुस्तीही करण्यात आली आहे, त्याची चाचणी बुधवारी घेतली जाणार आहे.