होमपेज › Kolhapur › कोल्हापूर-मुंबई पहिली फ्लाईट फुल्ल

कोल्हापूर-मुंबई पहिली फ्लाईट फुल्ल

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 11 2018 1:18AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर-मुंबई मार्गावर दि. 22 पासून सुरू होणार्‍या विमानसेवेची पहिली फ्लाईट फुल्ल झाली आहे. 18 सीटस्पैकी 17 सीटस् मंगळवारी सायंकाळपर्यंत बुक झाल्या. यामुळे या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळणार हे स्पष्ट झाले आहे.

‘उडान’ योजनेंतर्गत कोल्हापूर-मुंबई मार्गावर विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. या विमानसेवेसाठी तिकिटाचे दर कमी असल्याने कोल्हापूर-मुंबई विमानवारीची अनेकांना उत्सुकता आहे. रविवारी विमानाची चाचणी झाल्यानंतर बुकिंगसाठी विचारणा करणार्‍यांच्या संख्येत वाढ होत आहे. या 18 सीटर विमानातील पहिल्या 9 सीटस्साठी 1 हजार 970 रुपये भाडे तर पुढच्या नऊ सीटस्साठी 3 हजार 750 रुपये अधिक 200 रुपये अधिभार असे भाडे राहणार आहे.
कोल्हापूर-मुंबई मार्गावर रेल्वेच्या फर्स्ट क्‍लासच्या दरातच कोल्हापूर-मुंबई विमान प्रवास करता येणार आहे. यामुळे पहिलीच फ्लाईट अवघ्या दोन दिवसांत फुल्ल झाली आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत 18 पैकी 17 सीटस् बुक झाल्या आहेत. उर्वरित एक सीट एक-दोन दिवसांत बुक होईल, असे विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य समीर शेठ यांनी सांगितले. दरम्यान, प्रवाशांना विमानतळावरही तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत तसेच शहराच्या मध्यवर्ती भागातही कंपनीचे तिकीट विक्री केंद्र सुरू करण्याचाही विचार सुरू आहे.

Tags : Kolhapur, Kolhapur, Mumbai, First, Flight, Full