Wed, Jul 17, 2019 16:36होमपेज › Kolhapur › कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पूर्ववत

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पूर्ववत

Published On: Jul 30 2018 1:29AM | Last Updated: Jul 30 2018 12:58AMउजळाईवाडी : वार्ताहर

एअर डेक्कन कंपनीची मुंबई-कोल्हापूर विमानसेवा रविवारपासून सुरू झाली. मुंबई विमानतळावरून दुपारी दीडच्या सुमारास सुटलेले विमान कोल्हापूर विमानतळावर अडीचच्या सुमारास लँडिंग झाले. विमानातून तीन प्रवाशांचे आगमन झाले. यामध्ये  गायक सुरेश वाडकर यांचा समावेश होता. दोन प्रवासी मुंबईला गेले. 

उड्डाण योजनेंतर्गत एअर डेक्कन कंपनीकडून मुंबई-कोल्हापूर विमानसेवा एप्रिलपासून सुरू केली. रविवार, मंगळवार, बुधवार अशी तीन दिवस असलेली विमानसेवा दोन महिन्यातच म्हणजेच 24 जून रोजी बंद झाली. मुंबई येथे जोरदार पाऊस व खराब हवामान याचे कारण पुढे करत ही सेवा बंद होती. 

दरम्यान, एअर डेक्कन ही सेवा 29 जुलैनंतर देण्यास असमर्थ  ठरल्यास कंपनीचे कॉन्ट्रक्ट रद्द करावे, अशी मागणी खा. संभाजीराजे यांनी केंद्रीय विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू व राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्याकडे भेटून केली होती. या मागणीची गंभीर दखल घेत विमान वाहतूक मंत्रालयातून कडक सूचना एअर डेक्कन कंपनीस दिल्या होत्या. कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरळीत ठेवली नाही, तर त्यांच्याऐवजी कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचे कॉन्ट्रॅक्ट एअर इंडियाचा उपक्रम असलेल्या अलायन्स एअर कंपनीला दिले जाईल, असे राज्यमंत्री सिन्हा यांनी संगितले असल्याचे खा. संभाजीराजे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले होते.

या अनुषंगाने रविवारची विमानसेवा एअर डेक्कन कोल्हापूरसाठी पुरवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर दुपारी अडीचच्या सुमारास एअर डेक्कनचे विमान लँडिंग झाले.