Tue, Jul 07, 2020 12:30होमपेज › Kolhapur › महापौर चषक कुस्ती स्पर्धेत २५६ मल्लांचा सहभाग

महापौर चषक कुस्ती स्पर्धेत २५६ मल्लांचा सहभाग

Published On: Dec 06 2017 2:01AM | Last Updated: Dec 06 2017 2:01AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

पावसाच्या रिपरिपीत, लाल मातीच्या आखाड्यात रंगलेल्या चटकदार कुस्त्या, रणहलगी-कैचाळ-घुमक्याची साथ आणि टाळ्या-शिट्ट्यांचे प्रोत्साहन अशा वातावरणात लहान-मोठ्या गटातील पुरुष कुस्तीगिरांबरोबरच महिला खेळाडूंनी चटकदार कुस्त्या करत उपस्थितांची मने जिंकली. कोल्हापूर महापालिकेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे आयोजित राज्यस्तरीय ‘महापौर चषक’ कुस्ती स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा मंगळवारी राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानावर झाला. स्पर्धेत 218 पुरुष स्पर्धकांसह 38 महिला कुस्तीगिरांनी सहभाग नोंदविला आहे.  

महापौर सौ. हसिना फरास  व आयुक्त डॉ. अभिजित चौधरी  यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समिती सभापती डॉ. संदीप नेजदार, महिला-बालकल्याण सभापती वहिदा सौदागर, परिवहन सभापती नियाज खान, गटनेता शारंगधर देशमुख, नगरसेवक अशोक जाधव, लाला भोसले, तालीम संघाचे सरचिटणीस अ‍ॅड. महादेवराव आडगुळे,  रुस्तुम-ए-हिंद पै. दादू चौगुले, हिंदकेसरी विनोद चौगुले, पै. नामदेव पाटील, पै. नामदेव मुळे, पै. सुखदेव येरुडकर, पै. अशोक माने, पै. विष्णू जोशीलकर, पै. संभाजी वरुटे, उपमहाराष्ट्र केसरी अमृत भोसले,  माजी नगरसेवक आदिल फरास, सचिन चव्हाण, प्रमोद बराले, सचिन जाधव,  बटू जाधव, अशोक माने, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर आदी उपस्थित होते. हलगीवादक संजय आवळे यांच्या पथकाने वातावरण निर्मिती केली.     

सलामीच्या कुस्तीमध्ये महिला गटातून मुरगूडच्या नंदिनी साळोखेने सांगलीच्या प्रतिभा बागडी वर गुणांच्या आधारे मात केली. तर पुरुष गटात कौस्तुभ डाफळे (पिंपळगाव) वि. शुभम पाटील (कराड) यांच्यात झालेल्या सामन्यात कौस्तुभ डाफळे याने विजय मिळविला. पाडळीच्या विजय पाटील याने सांगलीच्या अमर गाढवे याला आस्मान दाखविले. शाहूपुरीच्या राहुल सरक याने मानकापूरच्या शिवानंद दड्डी याचा पराभव केला. मिणचेच्या श्रीमंत भोसलेचा वडणगेच्या अतुल मानेने पराभव केला. कडेगावच्या विजय शिंदेवर सावेच्या अजित पाटीलने विजय मिळविला. करमाळ्याच्या भरत लोकरेवर सांगलीच्या विकास पाटीलने विजय मिळविला. गंगावेशच्या विश्‍वजित कदमने पारगावच्या प्रदीप चौगलेचा पराभव केला. स्पर्धा 8 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत.