Sat, Nov 17, 2018 03:51होमपेज › Kolhapur › कोल्हापूरचा खासदार दिल्‍लीत ठरणार

कोल्हापूरचा खासदार दिल्‍लीत ठरणार

Published On: Apr 23 2018 1:50AM | Last Updated: Apr 23 2018 1:47AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत बंडाळीची पूर्ण जाण असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी कोल्हापूरचा खासदार दिल्‍लीत ठरणार, असे सूचक उद‍्गार काढत, कोल्हापुरात पक्षांतर्गत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.खा. पवार हे रविवारी दोन दिवसांच्या कोल्हापूर दौर्‍यावर आले आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर खा. पवार यांनी मध्यवर्ती एकीकरण समितीच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार बैठकीत एकीकरण समितीचे उमेदवार कसे निवडले, याचे उदाहरण सांगताना कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवार ठरविताना पक्षातील ज्येष्ठ नेतेमंडळी उमेदवारांची नावे प्रदेश कमिटीकडे पाठवतात, त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाते, असे सांगून कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार हा दिल्‍लीत ठरविण्यात येईल, असे सूचकपणे सांगत जिल्ह्यातील नेत्यांना कानपिचक्या देण्याचा प्रयत्न केला आहे.

जिल्ह्यातील नेत्यांमध्ये वर्चस्ववाद

कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वर्चस्ववाद सुरू आहे. आ. हसन मुश्रीफ व खा. धनंजय महाडिक यांच्यात वर्चस्वावरून शीतयुद्ध सुरू आहे. राधानगरी-भुदरगडमध्ये के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील या मेहुण्या-पाहुण्यांमध्ये विधानसभा निवडणुकीवरून आतापासून जोरदार चर्चा आहे. जिल्ह्याचे पदाधिकारी निवडीच्या बैठकीवेळी आ. हसन मुश्रीफ यांनी के. पी. आणि ए. वाय. यांना मेहुण्या-पाहुण्यांचा वाद घरातच मिटवा, असे स्पष्ट केले आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धैर्यशील माने यांनी हातकणंगले लोकसभा मतदार संघातून आपल्याला उमेदवारी द्यावी, अन्यथा बंडखोरी करण्याचा इशारा दिला आहे, यावरून राष्ट्रवादीमध्ये बंडाळी सुरू झाली आहे.

Tags : Kolhapur, Kolhapur, MP,  Selected, Delhi