Tue, May 21, 2019 00:05होमपेज › Kolhapur › अवघे कोल्हापूर शिवमय

अवघे कोल्हापूर शिवमय

Published On: Feb 19 2018 1:22AM | Last Updated: Feb 19 2018 12:58AMकोल्हापूर : प्रतिनिधी

रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण करून महाराष्ट्रासह अवघ्या देशाच्या इतिहासाला कलाटणी देणार्‍या शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करण्यासाठी अवघे कोल्हापूर सज्ज झाले आहे. त्यांच्या रूपाने मराठमोळ्या जनतेचे भाग्यविधाते जन्माला आले. अशा या राजाचा जयंती सोहळा प्रतिवर्षीप्रमाणे 19 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. यानिमित्ताने गेला आठवडाभर सर्वत्र विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सोमवार शिवजयंतीचा मुख्य दिवस असल्याने पहाटेपासून शिवज्योत स्वागत, सकाळी 10 वाजून  10 मिनिटांनी जन्मकाळ सोहळा आणि सायंकाळी पारंपरिक लवाजाम्यासह भव्य मिरवणुका असे कार्यक्रम होणार आहेत.

शिवशाहिरांचे पोवाडे, इतिहास संशोधकांची व्याख्याने, गडकोट-किल्ले, शिवछत्रपतींच्या शस्त्रास्त्रांची प्रदर्शने, यासह  प्रबोधनपर शिवजयंती सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. प्रतिमापूजन, मिरवणुका यातून केवळ जयघोष करण्यापेक्षा भावी पिढीच्या ज्ञानात भर घालणार्‍या विचारांच्या शिवजयंतीचे महत्त्व लोकांना पटू लागल्याने अशा कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जात आहे. गल्ली-बोळात, चौकाचौकात, रस्त्यांच्या दुतर्फा भगव्या पताका, भगवे ध्वज, गुढ्या आणि ऐतिहासिक देखावे उभारण्यात आले आहेत. पोवाडे, पारंपरिक वाद्यांचा गजर यांनी अवघे वातावरण शिवमय झाले आहे. शिवज्योत आणण्यासाठी ठिकठिकाणच्या गडकिल्ल्यांवर मावळ्यांची गर्दी झाली होती.

शिवाजी तरुण मंडळाची मिरवणूक

शिवाजी पेठेतील श्री शिवाजी तरुण मंडळातर्फे सोमवारी दि. 19 रोजी सकाळी 10 वाजता जन्मकाळ सोहळा आणि सायंकाळी साडेचार वाजता पारंपरिक पद्धतीच्या भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. शाहू महाराज, पालकमंत्री चंद्रकांत पाटील  व दै. ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन होईल. यावेळी खा. धनंजय महाडिक, महापौर स्वाती यवलुजे, आ. राजेश क्षीरसागर, आ. चंद्रदीप नरके, आ. अमल महाडिक, आ. हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील, आ. सुरेश हाळवणकर आदी उपस्थित राहणार आहेत.

मंगळवारपेठेत युद्धकलेची प्रात्यक्षिके

सकल मराठा मावळा संघटनेतर्फे संयुक्‍त शिवजयंती सोहळ्यांतर्गत सोमवारी दि. 19 रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून मिरजकर तिकटी येथे शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहेत. तलवार, पट्टा, विटा, भाला, बाणा, फरीगदका यासह विविध प्रकारची शस्त्रास्त्रे चालविण्याची चित्तथरारक प्रात्यक्षिके मावळे व रणरागिणी सादर करणार आहेत.

नर्सरी बागेतील शिवमंदिरात पारंपरिक सोहळा

छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्या वतीने नर्सरी बागेतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात शिवजयंतीचा पारंपरिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. करवीर संस्थानच्या दरबारी लवाजम्यासह पालखी मिरवणूक, छत्रपती शाहू विद्यालयाचे संचलनालय, छत्रपती शाहू संगीत विद्यालयाचे गायन यासह जन्मकाळ सोहळा होणार आहे. यावेळी छत्रपती घराण्यातील प्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्फे शिवजयंतीनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी दि. 19 रोजी सायंकाळी पाच वाजता, श्री शाहू विजयी गंगावेस तालीम परिसरात व्याख्यान होणार आहे. यात ‘शिवछत्रपतींची उद्योगनीती’ या विषयावर प्रा. सागर वातकर यांचे व्याख्यान होणार आहे. कैलासगडची स्वारी मंदिरात उत्सव
मंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी मंदिरात सोमवारी दि. 19 रोजी शिवजयंतीचा सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे. मंदिराचे अध्यक्ष बबेराव जाधव यांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन होईल. यानंतर श्री मंगेशलक्ष्मी महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर शिवचरित्रावर व्याख्यानही होणार आहे.

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडची मिरवणूक

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी दि. 19 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता, हुतात्मा पार्क येथून मिरवणुकीची सुरुवात होईल. याचा प्रारंभ आ. हसन मुश्रीफ, आ. राजेश क्षीरसागर, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, संभाजी ब्रिगेडचे हिंदुराव हुजरे-पाटील, युवाशक्‍तीचे पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते होणार आहे.

शिवशक्‍ती प्रतिष्ठानची शिवजयंती 

बालकल्याण संकुलात शिवछत्रपतींची जयंती आणि संस्थेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त शिवशक्‍ती प्रतिष्ठानतर्फे सामाजिक बांधिलकी जपणार्‍या शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी दि. 19 रोजी सकाळी 11 वाजता, मंगळवारपेठ पाण्याचा खजिना येथील बालकल्याण संकुलात सामाजिक विषयाची शिवजयंती साजरी होणार आहे. अनावश्यक खर्चास फाटा देऊन जमा झालेल्या देणगीतून बालकल्याण संकुलातील मुलांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तू व धान्य यांची मदत करण्यात येणार आहे.