Sun, Jul 21, 2019 16:26
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : दगडी पुलांवर ठेवा वॉच

कोल्‍हापूर : दगडी पुलांवर ठेवा वॉच

Published On: Jun 22 2018 2:08AM | Last Updated: Jun 22 2018 12:36AMकोल्हापूर : प्रतिनिधी

आपल्या हद्दतील दगडी कमानी असणार्‍या पुलांची काळजी घेण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाहहहने महापालिका व नगरपालिकांना केली आहे. याबाबतचे परिपत्रकच कोल्हापूरसह सर्व महापालिका आणि नगरपालिकांना पाठविले आहे. शहरात दगडी बांधकाम असणारे सात पूल आहेत, त्या पुलांवर महापालिकेला गस्तही घालावी लागणार आहे. 

रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर एक सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने पुलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने विविध उपाययोजना राबविण्याबाबत सूचना केली होती. त्यानुसार राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या देखभाल- दुरुस्तीसह पुलांची काळजी घेण्याबाबत संबंधितांना सूचना देणारे परिपत्रक पाठविले आहे.

महापालिका क्षेत्रात असलेल्या पुलांसाठी आता नोंदवही ठेवावी लागणार आहे. या नोंदवहीत कमाल पूर पातळी तसेच पूर पातळीत मोठी वाढ झाली तर त्याची नोंद करावी लागणार आहे. त्यानुसार पुलांच्या स्तंभावर तशा वर्षनिहाय नोंदी लिहाव्या लागणार आहेत. या पुलांच्या बांधकामात उगवलेली झाडे-झुडपे काढून टाकून ती पुन्हा उगवणार नाहीत, याकरिता रासायनिक द्रव्यांचा वापर करण्याचीही सूचना करण्यात आली आहे.

या पुलावर रात्रीच्या वेळी दृश्यमानता वाढावी याकरिता प्रकाश व्यवस्था करावी. पुलाच्या दोन्ही बाजूस सौर ऊर्जेवरील ब्लिंकर्स, रिफ्लेक्टिव्ह बसविण्यात यावेत. पुलाच्या दोन्ही बाजूला पुलाची स्थिती दर्शविणारे सूचना फलक लावणेही बंधनकारक करण्यात आले आहे. पुलावरील वेगाची मर्यादा कमी रहावी याकरिता पुलाच्या आरंभ आणि शेवट अशा दोन्ही बाजूला रम्बलर स्ट्रिप्स बसविण्यात याव्यात, अशाही सूचना या परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.

पावसाळ्यात पुराची वाढणारी पातळी, पावसाचे प्रमाण, भविष्यातील परिस्थिती याबाबत विचार करून स्थानिक प्रशासनाने पुलावरील वाहतूक बंद करावी की नाही याबाबतचा निर्णय घ्यावा, असेही या परिपत्रकात स्पष्ट केले आहे. पावसाळ्याच्या कालावधीत या पुलावर वारंवार गस्त घालावी, अशीही सूचना देण्यात आली आहे. यासह देखभाल, दुरुस्तीशी संबंधित तांत्रिक सूचनाही देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात या सूचनांचे पालन करणे बंधनकारक असले तरी या सर्व बाबींसाठी निधीचाही प्रश्‍न निर्माण होणार आहे. त्यामुळे या सूचना केवळ कागदोपत्रीच राहण्याची शक्यता अधिक आहे.

दुरुस्तीचा 1 कोटी 84 लाखांचा प्रस्ताव

शहरात आठ पूल आहेत. या सर्वच पुलांवरून मोठ्या प्रमाणात जड आणि हलक्या वाहनांची वाहतूक होते. यापैकी एका पुलाचे आयुष्यमान 148 वर्षांचे झाले आहे. सर्वात कमी आयुष्यमान असलेल्या पुलाचे बांधकाम 63 वर्षांपूर्वीचे आहे. त्यामुळे या पुलांच्या दुरुस्तीची गरज निर्माण झाली आहे. याकरिता महापालिकेने गेल्या वर्षी 1 कोटी 84 लाख रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. निधीअभावी या पुलांची देखभाल, दुरुस्ती कशी करायची, कशी काळजी घ्यायची? हा प्रश्‍नही महापालिकेसमोर आहे.

शहरातील पुलांची स्थिती

 संभाजी पूल-(बांधकाम 1870) कोंडा ओळ ते व्हीनस कॉर्नर
 शाहू पूल-(बांधकाम 1875) दसरा चौक ते व्हीनस कॉर्नर
 जयंती पूल-(बांधकाम 1876) दसरा चौक ते कसबा बावडा
 रविवार पूल-(बांधकाम 1879) उमा टॉकीज ते पार्वती टॉकीज
 विल्सन पूल-(बांधकाम 1927) फोर्ड कॉर्नर ते व्हीनस कॉर्नर
 हुतात्मा पूल (बांधकाम 1955)  टेंबे रोड ते उद्यमनगर
 हुतात्मा पूल (बांधकाम 1955)  मंगळवार पेठ ते वाय.पी.पवार नगर