Tue, Jun 18, 2019 22:52होमपेज › Kolhapur › करवीर नगरीतील प्राचीन शिवालये

करवीर नगरीतील प्राचीन शिवालये

Published On: Feb 13 2018 2:04AM | Last Updated: Feb 13 2018 12:09AMकोल्हापूर : प्रिया सरीकर

आई अंबाबाईच्या वास्तव्याने पावन झालेल्या करवीरनगरीत अनेक प्राचीन शिवालये आहेत. यातील अनेक मंदिरांचा संदर्भ करवीर महात्म्यातही आहे. परिसरातील तलाव, तीर्थ, कुंड आणि त्यांच्या धार्मिक महत्त्वातून या शिवालयांची नावे पडली आहेत. याशिवाय क्षेत्र रक्षणाची जबाबदारी  बजावणार्‍या महाद्वार लिंग आणि अष्टमहालिंग म्हणून प्रचलित असलेली शिवस्थाने आहेत. कोल्हापूर शहरामध्ये लक्षतीर्थ, कोटीतीर्थ, वरुणतीर्थ, रावणेश्‍वर, काशीविश्‍वेश्‍वर, अरिबलेश्‍वर, सोमेश्‍वर, ऋणमुक्‍तेश्‍वर, वटेश्‍वर, चंद्रेश्‍वर, सूर्येश्‍वर, उत्तरेश्‍वर, बाळेश्‍वर अशी अनेक प्राचीन महादेव मंदिरे आहेत. शहराच्या चारी दिशांना वसलेल्या तलावाच्या काठी तसेच शहराच्या मध्यावर अनेक ठिकाणी ही मंदिरे आहेत. अनेक मंदिरांचा 

जिर्णोद्धार करण्यात आला आहे. तर आजही अनेक मंदिरे आपले प्राचीन सौंदर्य टिकवून आहेत. महाशिवरात्रीनिमित्त यापैकी काही मंदिरांचा अल्पपरिचय... ग्रामदैवत कपिलेश्‍वर, वरुणतीर्थ आणि लक्षतीर्थ महादेव तळ्यांचे शहर म्हणूनही परिचित असलेल्या कोल्हापुरात अनेक ठिकाणे पाणथळांच्या नावांनी वसली आहेत. या तळ्यांच्या काठी हमखास प्राचीन महादेवाची मंदिरे पाहायला मिळतात. कपिलतीर्थही या तिर्थांपैकीच एक कपिलतिर्थाच्याकाठी कपिलेश्‍वराचे मंदिर आहे. कालांतराने कपिलतीर्थ उरले नसले तरी कपिलेश्‍वराचे अस्तित्व याठिकाणी कायम आहे. कपिलेश्‍वराचे हेमाडपंथी मंदिर आजही कोल्हापूरचे ग्रामदैवत मानले जाते. सध्याचे गांधी मैदान म्हणजे वरुणतीर्थ. वरुणराजाने तपश्‍चर्या करून प्राप्त केलेले तीर्थ म्हणूनही याची ख्याती आहे.

याठिकाणीही वरुणतीर्थ महादेवाचे लहानसे मंदिर आहे. अंबाबाई मंदिरात श्री अतिबलेश्‍वराचे मंदिर आहे. तर ब्रम्हेश्‍वर बाग परिसरात ब्रम्हेश्‍वर महादेवाचे हेमाडपंथी मंदिर आहे. शहरातून फुलेवाडीकडे जाताना लक्षतीर्थ महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे येथील शिवलिंग चौकोनी आहे.  रावणेश्‍वर महादेव : सध्याच्या शाहू स्टेडियमच्या जागी पूर्वी रावणेश्‍वर तलाव होता. या तलावातील मंदिर म्हणजे रावणेश्‍वर महादेवाचे मंदिर. तलावातील या मंदिराची प्रतिष्ठापना पुढे साठमारी परिसरात करण्यात आली. चार वर्षांपूर्वी मंदिराचा  जिर्णोद्धार करण्यात आला आहे. त्यामुळे मंदिराला नवे रूप प्राप्त झाले आहे. रावणेश्‍वर मंदिर प्राचीन शिवालयांपैकी असल्याने याठिकाणी भक्‍तांची दर्शनासाठी गर्दी असते. 

सर्वेश्‍वर महादेव :

 पंचगंगेच्या काठी असणारे महादेव मंदिर म्हणजे सर्वेश्‍वर महादेव मंदिर. शिवाजी पुलाच्या बाजूला पंचगंगा स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस सर्वेश्‍वराचे छोटे पण सुंदर मंदिर आहे. सर्वेश्‍वर महादेवाचे दर्शन घेतल्याने करवीर क्षेत्रातील सर्व देवदेवतांचे दर्शन घेतल्याचे पुण्य मिळते, असा पुराण ग्रंथात उल्लेख आहे. मंदिरात मोठाले शिवलिंग आहे. या मंदिरानजीकच उग्रेश्‍वर महादेवाचे मंदिर आहे. उग्रेश्‍वर महादेवाला स्मशानभूमीतील महादेव म्हणूनही ओळखले जाते. 

शिव-पार्वतीचे सोमेश्‍वर मंदिर :

 पंचगंगा नदीच्या मार्गावरच एका गल्लीमध्ये सोमेश्‍वराचे मंदिर आहे. मंदिरात शिवलिंग आणि नंदीसोबत पार्वतीचीही आकर्षक मूर्ती आहे. सोमेश्‍वर मंदिराच्या मूळ दगडी बांधकामावर संगमरवरी फरशी बसवण्यात आली आहे. सखलात कोरीव दगडी शिवलिंग आणि त्यामागे हाती तलवार, त्रिशूल आणि कुंकवाचा करंडा घेतलेली पार्वतीची मूर्ती आहे. करवीर महात्म्यात या मंदिराचा उल्लेख असून उमा (पार्वती) व ईश्‍वर म्हणजे उमेसह ईश्‍वर म्हणजेच सोमेश्‍वर असा त्याचा नामोल्लेख केला जातो. 

पेटाळ्यातील शंभू महादेव :

 पूर्वीचा पेटाळा तलाव आणि सध्याच्या न्यू एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावर शंभू महादेवाचे मंदिर आहे. भक्‍कम दगडी आणि उंच पायावर हे मंदिर बांधण्यात आले आहे. शिवलिंग, नंदी, गणेश यासह विविध मूर्ती शिल्पे या मंदिरासमोर आहेत. काही वर्षांपूर्वी  काळ्या पाषाणातील मंदिरालाही संगमरवराने झाकण्यात आले आहे. बाळेश्‍वर महादेव :  पंचगंगा नदीकाठी सन 1597 च्या सुमारास करवीर पीठाच्या शंकराचार्य मठाची उभारणी झाली. मठाच्या मागील बाजूस असलेल्या मस्कुती तलाव परिसरात बाळेश्‍वर मंदिर आहे. हेमाडपंथी पद्धतीच्या या मंदिरात शिवलिंग, नंदीची मूर्ती अत्यंत देखणी आहे. मंदिर परिसरात गणेश व मारुतीच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या मागे द्वादशकोणी विहीर आहे. विहिरीत उतरण्यासाठी पायर्‍या असून विहीर दगडी बांधकामानी बंदिस्त आहे.

नंदीशिवाय चंद्रेश्‍वर आणि नंदी महादेव मंदिर : 

महादेव मंदिराची रचना म्हणजे साधारणत: गाभार्‍यात शिवलिंग आणि गाभार्‍याबाहेर नंदी अशी पाहायला मिळते; पण याला छेद देणारीही काही मंदिरे कोल्हापूर शहरात पाहायला मिळतात. शिवाजी पेठेतील चंद्रेश्‍वर महादेव मंदिर नंदीशिवाय पाहायला मिळते. तर शेजारीच म्हणजे मर्दानी खेळाच्या आखाड्यालगत नंदी महादेव मंदिरात नंदीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून गाभार्‍याबाहेर शिवलिंग असलेले पाहायला मिळते. भारतात मद्रास येथे असे मंदिर असल्याचे सांगितले जाते. शिवाजी पेठेत चंद्रेश्‍वर गल्लीत चंद्रेश्‍वर महादेवाचे लहान मंदिर आहे. या मंदिरात नंदी नाही; पण इथला नंदी म्हणजेच नंदी महादेव मंदिरातील नंदी असल्याचे लोक सांगतात.

पाचगाव येथील पांचालेश्‍वर मंदिर

येथील पांचालेश्‍वर मंदिर पुरातन असून त्याची नोंद करवीर महात्म्य या ग्रंथात आढळते. महाभारतातील पाच पांडव येथे वास्त्यव्यास असताना त्यांनी एका रात्रीत हे मंदिर बांधल्याची अख्यायिका आहे. यावरूनच पाचगाव हे नाव या गावाला मिळाले आहे, असे ज्येष्ठ जाणकार नागरिक सांगतात. महाशिवरात्रीला मंदिराची सजावट मोठ्या थाटामाटात करून या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.
 

बालिंगेचे जागृत देवस्थान श्री महादेव

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर रस्त्यालगत असणारे बालिंगे  (ता. करवीर) येथील महादेव मंदिर एक जागृत देवस्थान म्हणून उदयास आले आहे. हे मंदिर महादेव तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उभारले आहे. तरुणांच्या प्रयत्नातून साकारलेले हे मंदिर आजच्या तरुणांपुढे एक आदर्श आहे.  बालिंगे-दोनवडे गावच्या सीमेवर असलेल्या रिव्हज पूल तयार करण्याचे काम सुरू असताना पायखुदाईवेळी कारागिरांना एका भल्या मोठ्या दगडावर महादेवाचे लिंग आढळून आले, तसेच बालिंगे गावाच्या नावातच लिंग हा शब्द असल्याने यामध्ये केवळ योगायोग नाही तर काही साधर्म्य असावे, अशी धारणा झाली आणि लिंगाची प्रतिष्ठापना केली हा पूल पूर्ण होईपर्यंत कामगार त्याची दररोज पूजा करत असत पूल पूर्ण झाला मात्र येथील लोकांची भक्‍ती कायम राहिली. प्रतिष्ठापना केलेले लिंग ओढ्यावर असू नये म्हणून त्यावेळच्या लोकांनी एक मंदिरवजा वास्तू या लिंगावर बांधली.

मंदिर उभारणी केल्यावर येथील तरुणांनी एकत्र येऊन 10 मे 1983 साली महादेव तरुण मंडळाची स्थापना केली 2007 साली या मंडळाने रौप्यमहोत्सव साजरा केला. महादेवावर असलेली भक्‍ती आणि त्यांच्या आशीर्वादाने भक्‍तांच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ लागल्या, अशी धारणा तरुणांची झाली आणि मंदिर सुशोभित करण्याचा सर्वांनी निर्धार केला. दरवर्षी श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी येथे अभिषेक घालण्यात येतो. ही प्रथा मंडळाच्या पुढच्या पिढीने आजही जपली आहे. देवाची पूजाअर्चा नित्यनेमाने बाळासाहेब अतिग्रे हे करतात. बालिंगे, दोनवडे, नागदेववाडी, साबळेवाडी, खुपिरे, वाकरे आदी परिसरात या मंदिराची ख्याती आहे. येथील अनेक भक्‍त येथे दर्शनासाठी येतात.

 नारायण गडकरी :  हेमाडपंथी वैजनाथ मंदिर; भक्‍ती अन् पर्यटनाचा संगम

 डोंगरात वसलेल्या वैजनाथ मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. विरंगुळा म्हणून भक्‍ती आणि पर्यटन या भूमिकेतून पर्यटकांची वाढ झाली आहे.  वैजनाथ मंदिर बेळगावपासून केवळ 18 कि. मी. आणि चंदगडपासून 28 कि. मी. अंतरावर आहे. देवरवाडी ते वैजनाथ 2 कि. मी. चा मोठा चढ आहे. तर वैजनाथ-महिपाळगड पासूनचा खाली सुंडी पर्यंत 5 कि. मी.चा मोठा उतार आहे. वाढत्या पर्यटकांच्या  द‍ृष्टिकोनातून या परिसराचा विकास होणे अत्यंत गरजेचे आहे. या पर्यटनस्थळाला ‘क’ वर्गाचा दर्जा मिळाला असला तरी अद्यापही याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

दक्षिण भारतातील ‘होयसळ’ राजवटीच्या सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी या प्रदेशावर दाक्षिणात्य होयसळ या राजाची राजवट होती. त्यादरम्यान वैजनाथ आरगम्मा देऊळ हे संयुक्‍त मंदिर बांधण्यात आले होते. देवळाच्या वरच्या बाजूच्या तिर्थातून ओसंडणारे पाणी दोन्ही देवळांच्या मधून वाहत होते. त्या जागी कालांतराने आदिलशाही राजवटीत कमानीचे बांधकाम करण्यात आले आहे. तसेच 500 वर्षांपूर्वी मुस्लिम राज्यकर्त्यांकरवी ‘अग्यारी’ धर्मशाळा बांधण्यात आली आहे.

हे या मंदिराचे मोठे वैशिष्ट्य आहे. गावाला पाणीपुरवठा करणारे झर्‍याचे ठिकाण ‘गायमुख’ पर्यंत वाट केल्यास या प्राचीन जलस्त्रोताचे दर्शन घेता येते. त्याच प्रमाणे गावाजवळचे दक्षिणाभिमूख गणेश मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. एकंदरीत हा परिसर डोंगरात उंच ठिकाणी असल्याने अतिशय विलोभनीय द‍ृष्य या डोंगरावरून न्याहाळता येते. चंदगड, सातवणे, कोवाड, गंधर्वगड, येथेही महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी होते.