Tue, Apr 23, 2019 18:15होमपेज › Kolhapur › ‘शिवाजी’ची ‘खंडोबा’वर मात 

‘शिवाजी’ची ‘खंडोबा’वर मात 

Published On: Jan 22 2018 1:24AM | Last Updated: Jan 22 2018 1:14AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

 चुरशीच्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळाने खंडोबा तालीम मंडळ ‘अ’ संघाचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करून ‘केएसए लीग’ फुटबॉल स्पर्धेत पहिला विजय मिळविला. सामन्यात ‘शिवाजी’च्या संदीप पोवार याने पेनल्टी स्ट्रोकवर दोन्ही गोलची नोंद केली. खंडोबाकडून ऋतुराज संकपाळने गोल केला. छत्रपती शाहू स्टेडियमवर रविवारी झालेल्या सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी जलद खेळ केला. खंडोबाकडून कपिल शिंदे-बालिंगकर, सुधीर कोटिकेला, रणवीर जाधव, अजिज मोमीन, सागर पोवार यांनी आघाडीसाठी चढाया सुरू ठेवल्या. यात त्यांना 14 व्या मिनिटाला यश आले. ऋतुराज संकपाळने गोल नोंदवत आघाडी मिळविली.

शिवाजीकडून विशाल सासने, मंगेश भालकर, आकाश भोसले, प्रथमेश कांबळे, ओंकार साळवी, अक्षय सरनाईक यांनी गोल फेडण्यासाठी प्रयत्न केले. 40 व्या मिनिटाला झालेल्या चढाई खंडोबाच्या गोलक्षेत्रात चुकीच्या पद्धतीने रोखण्यात आल्याने पंचांनी शिवाजी मंडळला पेनल्टी बहाल केली. यावर संदीप पोवारने बिनचूक गोल नोंदवत मध्यंतरापर्यंत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. 
 दोन्हींकडून आघाडीसाठी जोराचे प्रयत्न झाले; मात्र फिनिशिंग आणि दोन्हींकडील भक्‍कम बचावामुळे गोल होऊ शकले नाहीत. सामन्याची वेळ संपल्यानंतर चौथ्या पंचांनी 5 मिनिटांचा जादावेळ दिला. यात चौथ्या मिनिटाला शिवाजी मंडळची चढाई खंडोबाच्या गोलक्षेत्रात अवैधरीत्या रोखण्यात आल्याने पंचांनी पुन्हा पेनल्टी बहाल केली. यावर शिवाजीच्या संदीप पोवार याने जोरदार फटक्यावर गोलपोस्टचा अचूक वेध घेतला आणि संघांला 2-1 असा विजय मिळवून  दिला.