Sun, Apr 21, 2019 01:50होमपेज › Kolhapur › कोल्हापूरच्या वैभवातील शताब्दी पर्वाला गुरुवारपासून प्रारंभ

कोल्हापूरच्या वैभवातील शताब्दी पर्वाला गुरुवारपासून प्रारंभ

Published On: Dec 02 2017 1:08AM | Last Updated: Dec 02 2017 12:34AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र शासन पुरस्कृत कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महोत्सव सहयोगाने 6 वा कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2017 चे आयोजन केले आहे. हा महोत्सव गुरुवार, दि. 14 ते 21 या सप्‍ताहात राजर्षी शाहू स्मारक भवनात होणार आहे. तीन चित्रपटगृहात दररोज पाच याप्रमाणे पंधरा चित्रपट दाखवण्यात येणार आहेत, अशी माहिती शनिवारी कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी यांनी दिली. यावेळी सचिव दिलीप बापट, निर्माते किशोर मिस्कीन, चित्रपट महामंडळाचे कार्यवाह रणजित जाधव उपस्थित होते.

या महोत्सवात विविध देशांतील चित्रपट, भारतीय प्रादेशिक चित्रपट, मायमराठी विभागात अप्रदर्शित 7 चित्रपट प्रक्षेपित करण्यात येणार आहेत.  प्रेक्षक व परीक्षक पुरस्कार पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, पटकथा यासाठी दिला जाणार आहे. दिग्दर्शक मागोवा या विभागांतर्गत भारतीय आणि विदेशी दिग्दर्शकांचे चित्रपट व लक्षवेधी देश या विभागामध्ये विविध देशांतील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. जगभरातील निवडक अभिजात चित्रपट, लघुपट विभागात विविध देशातील व भारतीय लघुपट स्पर्धेतील निवडक लघुपट दाखवले जातील. दिग्दर्शकास कलामहर्षी बाबुराव पेंटर स्मृती पुरस्कार, चित्रपट क्षेत्रात तांत्रिक योगदानाबद्दल चित्रमहर्षी आनंदराव पेंटर स्मृती पुरस्कार देण्यात येणार आहे.

खास आकर्षण

कोल्हापूर चित्रपट निर्मिती शतकपूर्ती कालातील दिग्दर्शक तसेच तंत्रज्ञ यांचे नामफलक महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या चित्रपटातील चित्रदृश्यांचे प्रदर्शन खास आकर्षण ठरेल. तसेच महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या स्थापनेपासून ते आजअखेर जगभरातील चित्रपटसृष्टीचा इतिहास शताब्दी पर्व काळात प्रदर्शित करण्यात येणार आहे. याचा प्राथमिक स्वरूपात ट्रेलर या महोत्सवात दाखवला जाईल. तसेच वर्षभरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी चित्रपटांविषयी विशेष कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत.

प्रेक्षक सभासद नोंदणी गुरुवारपासून सुरू

महोत्सवाकरिता नोंदणी शुल्क आकारण्यात येणार असून  शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी 4 ते 6 व फिल्म सोसायटी कार्यालय, गाळा नं. 7 , शाहू स्टेडियम येथे सायंकाळी 6 ते 8 यावेळेत करता येणार आहे. फिल्म सोसायटीचे सभासद, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे सभासद आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांना नोंदणी शुल्कामध्ये विशेष सवलत दिली जाणार आहे. तरूण पिढीला जुन्या चित्रपटांचा इतिहास उमगावा तसेच त्याचा आस्वाद घेण्यासाठी तरूणांईने या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.