Wed, Mar 20, 2019 22:55होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : एक्साईजमधील चौकशी कक्ष बंद

कोल्हापूर : एक्साईजमधील चौकशी कक्ष बंद

Published On: Feb 21 2018 1:12AM | Last Updated: Feb 21 2018 12:32AMकोल्हापूर : डी.बी.चव्हाण

देशाच्या आणि राज्याच्या संरक्षण यंत्रणेचा भाग असलेले कार्यालय म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभाग होय. इतर विभागांप्रमाणे याही विभागांवर कायद्याने जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी कोणतीही घटना घडली की या खात्यातील कर्मचारी, अधिकारी हजर असलेच पाहिजेत, असा नियम आहे. यामुळे हे कार्यालय सक्षम ठेवण्याची जबाबदारी वरिष्ठ अधिकार्‍यांची आहे. परंतु, येथील उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधीक्षक कार्यालयात उलटी परिस्थिती सुरू आहे. या कार्यालयात सुरू असलेला ‘चौकशी कक्ष’, कम ‘कंट्रोल रूम’ बंद करण्यात आली आहे. 

 चौकशी कक्ष’, कम ‘कंट्रोल रूम’ बंद असल्यामुळे कार्यालयात कामासाठी येणार्‍या सामान्य नागरिकांचीही मोठी गैरसोय होत आहे. खरं तर संरक्षण यंत्रणेचा भाग असलेल्या या कार्यालयातील कंट्रोल रूम, चौकशी कक्ष बंद करणे हा अधिकार्‍यांचा निष्काळजीपणा नाही का, असा सवालही नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कामकाज अधिकाधिक लोकाभिमुख व कार्यक्षम होण्यासाठी मद्यविक्रीचे परवाने देण्याच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्यात येत आहे. अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्यामागे रोजगार निर्मिती हा आहे, त्यासाठी या कार्यालयाचा जनसंपर्क वाढविणे हा भाग आलाच; पण तोच कक्ष बंद केला आहे. या कार्यालयात चौकशी कक्ष होता, या कक्षात दोन पोलिस आणि एक अधिकारी अशा तीन कर्मचार्‍यांची नियुक्‍ती केली होती. गेली अनेक वर्षे हा कक्ष चांगल्या पद्धतीने सुरू होता; पण गेले महिनाभर हा कक्ष अचानक बंद केला आहे.येथील दूरध्वनी सेवा सुरू आहे; पण त्याला प्रतिसाद मिळत नाही. 

 जिल्ह्यात 1321 मद्याची दुकाने आहेत. त्यात बीअर बारची संख्या 950 पर्यंत आहेत. उर्वरित देशी, विदेशी आणि बीअर शॉपीची दुकाने आहेत. विक्री अत्यंत चांगली होत असल्याने महसूल जास्त मिळतो. दुसरी बाब म्हणजे कर्नाटक आणि गोव्याहून मोठ्या प्रमाणावर चोरट्या दारूची होत आहे. ही वाहतूक रोखण्याची जबाबदारी या कार्यालयाची आहे. या सर्वांची देवाण- घेवाण करणे, चोरट्या दारूबाबत नागरिकांकडून माहिती मिळण्यासाठी चौकशी कक्ष आणि दूरध्वनी सेवा सुरू असणे गरजेचे आहे.

कक्ष सुरू करण्यासाठी प्रयत्नशील

उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधीक्षक कार्यालयात येणार्‍या नागरिकाला त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे मिळाली पाहिजेत, त्यासाठी या कार्यालयात चौकशी कक्ष असणे गरजेचे असून हा कक्ष सुरू करण्यासाठी आपले प्रयत्न राहतील, असे जिल्हा अधीक्षक गणेश पाटील यांनी सांगितले.