होमपेज › Kolhapur › सीपीआरमधून अर्भक गायब

सीपीआरमधून अर्भक गायब

Published On: Feb 25 2018 1:15AM | Last Updated: Feb 25 2018 12:47AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (सीपीआर) प्रसूती विभागातून एका महिलेच्या जुळ्यापैकी एक अर्भक गायब केल्याचा आरोप दाम्पत्यांनी केला आहे. आरोपात तथ्य नसल्याचा निर्वाळा महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिला. संबंधित दाम्पत्यांने याबाबत पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. सिरसे (ता. राधानगरी) येथील सौ. विद्या धनाजी चौगले यांना प्रसूतीसाठी नातेवाईकांनी 16 फेब्रुवारी रोजी सीपीआरमध्ये दाखल केले होते.दिवसभर त्यांच्यावर उपचार सुरू होते. रात्री साडेनऊच्या सुमारास डॉ. स्पंदन बालानंद यांनी प्रसूती केली असता, त्यांना मुलगा झाला.

16 फेब्रुवारी रोजी दिवसभरात प्रसूती विभागात 27 नैसर्गिक प्रसूती आणि 18 सिझेरियनच्या प्रसूती झाल्या. गेली नऊ दिवस सौ. चौगुले  व त्यांच्या बाळावर उपचार सुरू आहेत.  आपल्याला जुळी झाल्याचे दाम्पत्याचे म्हणणे आहे.  तब्बल आठ दिवसांनी शनिवारी (दि.24) दाम्पत्याने आरोप केल्याने सीपीआर प्रशासन अचंबित झाले आहे. शनिवारी सीपीआरमधून अर्भक चोरीस गेल्याची धक्‍कादाय माहिती पुढे येताच अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. शिरीष शहानभाग यांनी विभागास त्वरित भेट देऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली. संबंधित दाम्पत्याला प्रसूतीपूर्वीचे अल्ट्रासाऊंड तपासणीसह अन्य अहवालाची मागणी केली; पण संबंधित कुटुंबीयाने आपल्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याचे  सांगत डॉक्टरांशी हुज्जत घातली. त्यामुळे काहीकाळ गोंधळ झाला. 

या घटनेची दिवसभर सीपीआर परिसरात जोरदार चर्चा सुरू होती. घटनेची चौकशी करून प्रसूती पूर्वीचे अल्ट्रासाऊट अहवाल पाहून दोषींवर कारवाई करणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी दिली.