Fri, Apr 26, 2019 19:21होमपेज › Kolhapur › महाराष्ट्राचे खनिज कर्नाटकचा विकास

महाराष्ट्राचे खनिज कर्नाटकचा विकास

Published On: Jan 21 2018 2:47AM | Last Updated: Jan 20 2018 11:46PMकोल्हापूर : सुनील कदम

राधानगरी अभयारण्यातील बॉक्साईटच्या साठ्यावर नैसर्गिक न्यायाने महाराष्ट्राचा अग्रहक्क बनतो. त्यामुळे येथील बॉक्साईटच्या वापरातून शासनाला जर काही उद्योगधंदे उभारायचे असतील, तर नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाने असे उद्योगधंदे  प्रामुख्याने महाराष्ट्रातच उभारले गेले पाहिजेत. मात्र, सध्या येथील बॉक्साईटचा वापर करून कर्नाटकमध्ये औद्योगिक विकास सुरू आहे. त्यामुळे स्थानिक उद्योजक, नागरिक आणि प्रामुख्याने बेरोजगार युवकांनी या प्रकाराला ठाम विरोध करून येथील बॉक्साईटचे उत्खनन बंद पाडण्याची गरज आहे. हिंडाल्को कंपनीचा कर्नाटकातील बेळगाव शहरानजीक जवळपास 1,400 एकर परिसरात एक भलामोठा अ‍ॅल्युमिनियम प्लँट आहे.

या ठिकाणी कर्नाटकातील हजारो लोकांना रोजगार मिळालेला आहे. कंपनीने आपल्या प्लँटच्या आजूबाजूच्या परिसरातील काही खेडी दत्तक घेतली असून, त्या ठिकाणी कंपनीच्या खर्चातून शैक्षणिक आणि आरोग्यविषयक सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. विशेष म्हणजे, कर्नाटकात सुरू असलेला हा सगळा औद्योगिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक विकास राधानगरीतील बॉक्साईटच्या जीवावर झालेला आहे. म्हणजे एका अर्थी महाराष्ट्रातील भांडवलाच्या जोरावर कर्नाटकातील जनता विकासाची फळे चाखत आहे आणि बिचारी स्थानिक जनता मात्र पोटापाण्यासाठी परमुलूख धुंडाळत बसली आहे. हा इथल्या स्थानिक लोकांवर आणि प्रामुख्याने बेरोजगार पिढीवर होत असलेला अन्याय आहे. हिंडाल्को कंपनी राधानगरी अभयारण्याच्या ज्या भागात बॉक्साईटचे उत्खनन करते, त्या भागात कंपनीने कोणती समाजोपयोगी कामे केली, याचा शोध घेतल्यास पदरी निराशाच पडते. ‘दूध महाराष्ट्राचे आणि मलई कर्नाटकला’ असा हा सगळा मामला असल्याने स्थानिकांनी त्याला विरोध करण्याची गरज आहे.

पर्यावरणविषयक कडक नियमांमुळे राधानगरी तालुक्याच्या औद्योगिक विकासाला प्रचंड मर्यादा पडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत राधानगरी तालुक्याचा औद्योगिक विकास फार मोठ्या पिछाडीवर आहे. त्याचा परिणाम म्हणून तालुक्यात बेरोजगारांचे तांडेच्या तांडे निर्माण झालेले आहेत.  पर्यावरणविषयक नियमांमुळे जरी राधानगरीच्या औद्योगिक विकासाला मर्यादा पडत असल्या, तरी इथल्या बॉक्साईटचा वापर करून कोल्हापूर परिसरात ‘हिंडाल्को’सारखे उद्योग उभा करण्यात काहीच अडचण नाही. तसे झाले, तर कोल्हापूरसह राधानगरी परिसरातील हजारो बेरोजगारांना स्थानिक पातळीवर रोजगार तर मिळेलच, शिवाय या भागाच्या औद्योगिक विकासालाही चालना मिळेल. त्यामुळे स्थानिक उद्योजक, नागरिक आणि बेरोजगारांनी राज्य शासनाकडे तसा आग्रह धरण्याची गरज आहे.