Thu, Apr 25, 2019 22:16होमपेज › Kolhapur › साहित्यिक वातावरणासाठी संवाद आवश्यक

साहित्यिक वातावरणासाठी संवाद आवश्यक

Published On: Jan 21 2018 2:47AM | Last Updated: Jan 21 2018 1:28AMकोल्हापूर : प्रतिनिधी

साहित्यिक वातावरण तयार करण्यासाठी संवाद आवश्यक आहे, असे प्रतिपादन मराठी विश्‍वकोष महामंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर यांनी केले. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व करवीर नगर वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय दोन दिवसीय साहित्य  संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राम गणेश गडकरी हॉलमधील संमेलनाचे डॉ. ल. रा. नसिराबादकर हे अध्यक्ष आहेत.  करंबळेकर म्हणाले, सोशल मीडियाच्या माध्यमातून जग जवळ येत आहे, पण लोक दूर गेले आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या जंजाळात संवाद हरवत चालला आहे. आपले जीवन तंत्रज्ञानाने व्यापून टाकले आहे. जीवन, साहित्य व संस्कृतीचा परिणाम समाजमनावर होत चालला आहे.

सोशल मीडियामुळे माणसं एकमेकांना भेटण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. प्रत्येकजण या सोशल मीडियाच्या माध्यामातून आपले विचार मांडत आहे. प्रत्येकाचे विचाराचे जणू एक बेट तयार झाले आहे. त्यामुळे नव्याने लिहिणार्‍या व वाचणार्‍यांना एकत्र आणण्यासाठी ग्रंथालयांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.  करवीर नगर वाचन मंदिरने घेतलेले हे संमेलन एक विधायक पाऊल आहे, असे त्यांनी सांगितले.  यावेळी संमेलनाध्यक्ष ल. रा. नसिराबादकर म्हणाले, लोकांच्या बुद्धीला चेतना देण्याचे काम साहित्य करते.  सोप्या भाषेत व शब्दात तयार केलेले साहित्य  हे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. साहित्यामध्ये मोठे सामर्थ्य असून ते लोकजीवनाला आकार देण्याचे काम करते.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिकांचा करंबळेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये  रा. तु. भगत, चंद्रकुमार नलगे, जयसिंगराव पवार, श्याम कुरळे, जे. के. पोवार, कमल हर्डीकर, सरोज चौगुले,  विभा शहा, रवींद्र ठाकूर यांचा समावेश आहे. दुपारी करवीर नगरवाचन मंदिर येथून ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. रविवारी सुनील पाटील यांचे कादंबरी अभिवाचन तसेच डॉ. प्रकाश कल्लोळी यांचे ‘समााजिक जीवनात ग्रंथालयांचे स्थान’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सूत्रसंचालन सौ. अस्मिता कुलकर्णी यांनी केले. स्वागत वेदा सोनुले यांनी केले. प्रास्ताविक संजीवनी तोफखाने यांनी केले. नंदकुमार मराठे यांनी आभार मानले.