Thu, Apr 25, 2019 23:57होमपेज › Kolhapur › स्थायी सभापती भाजपकडून घोडेबाजार

स्थायी सभापती भाजपकडून घोडेबाजार

Published On: Feb 13 2018 2:03AM | Last Updated: Feb 13 2018 1:14AMकोल्हापूर  : प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण यांच्यावर पदांच्या बाबतीत कोणताही अन्याय झालेला नाही. पिरजादे गेली दोन वर्षे प्रभाग समिती सभापती आहेत. दोन वर्षे स्थायी समिती सदस्य आहेत. चव्हाण यांनी प्राथमिक शिक्षण मंडळ सभापतिपद भूषविले आहे. ते आता स्थायीत आहेत. तरीही पदाच्या बाबतीत अन्याय होत असल्याचा त्यांचा आरोप चुकीचा आहे. त्यांना सहा महिन्यांनंतर स्थायी सभापतिपद देण्याचा लेखी निर्णय झाला आहे. तरीही पिरजादे व चव्हाण यांनी व्हिप मोडून पक्षाला बदनाम केले आहे. यामागे भाजपकडून मोठा घोडेबाजार झाला आहे. महापालिका राजकारणात भाजपने हा चुकीचा पायंडा पाडला आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर व काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला.

राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांनी भाजपला शहर विकासासाठी मतदान केले असल्याचे सांगण्यात येत असले, तरी त्यामागे मोठ्या आर्थिक उलाढाली झाल्याची चर्चा  महापालिका वर्तुळात सुरू होती. सोशल मीडियातील व्हॉटस्अ‍ॅपही त्याला अपवाद ठरले नाही. व्हॉटस्अ‍ॅपवर  35 लाख, 50 लाख व 75 लाख व प्रत्येकी दीड कोटी असे तीन कोटींपर्यंत दिले असल्याचे मेसेज फिरत होते. शारंगधर देशमुख यांनीही पत्रकार परिषदेत दोघांनी स्वतःला विकले असल्याचा आरोप केला; परंतु अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण यांनी फक्‍त पदाची खांडोळी नको आणि पदासाठी अन्याय झाल्याने शहर विकासासाठी भाजपला मतदान केल्याचे सांगितले. प्रसंगी नार्को टेस्टलाही तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चंद्रकांत पाटील आता किती निधी  आणतात पाहू  : देशमुख

माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर दक्षिण किंवा कागल विधानसभा मतदारसंघ न पाहता कोल्हापूर शहरासाठी सुमारे बाराशे कोटींचा निधी खेचून आणला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे असूनही त्यांनी शहरासाठी गेल्या तीन वर्षांत काहीच निधी आणलेला नाही. केंद्रात व राज्यात सत्ता असताना भाजपचे महसूलमंत्री असलेले पाटील कोल्हापूरसाठी का निधी आणत नाहीत? त्यांना फक्‍त महापालिकेची सत्ता पाहिजे काय? आता भाजपला स्थायी सभापतिपद मिळाले आहे. त्यामुळे पालकंमत्री पाटील किती निधी आणतात पाहू, असा प्रश्‍न शारंगधर देशमुख यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

नेत्यांच्या नाराजीतून त्यांचे  मतपरिवर्तन : अमल महाडिक

राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांचे त्यांच्या नेत्यांच्या नाराजीतूनच मतपरिवर्तन होऊन त्यांनी भाजपला मतदान केले. भाजपच्या वतीने शहराच्या विकासासाठी भरघोस निधी आणला जात आहे. महालक्ष्मी तीर्थक्षेत्र परिसर आराखड्यासह अनेक योजना मार्गी लागत आहेत. या विकासाला हातभार लावण्यासाठीच पिरजादे व चव्हाण यांनी भाजपच्या उमेदरवारासोबत राहण्याचा निर्णय घेतला. विकासाच्या बाबतीत भाजप कोणतेही राजकारण करत नाही आणि करणार नाही, असे आ. अमल महाडिक यांनी सांगितले. 

पालकमंत्र्यांच्या दृष्टीने चमत्कार घडला?

केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेत कोणत्याही स्थितीत सत्ता येऊन महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकावा, अशी तीव्र इच्छा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची होती; परंतु ती इच्छा पूर्ण झाली नाही. त्यानंतरचे काही महिने पालकमंत्री पाटील वारंवार विविध कार्यक्रमांत काहीही करा; पण महापालिकेत सत्ता आणा, असे आवाहन नगरसेवकांना करत होते. त्यासाठी काही तरी चमत्कार घडेल, असे भाकितही ते व्यक्‍त करत होते. परिणामी, पालकमंत्र्यांच्या दृष्टीने हा चमत्कार घडला, अशी चर्चा सुरू आहे. 

पवार यांच्या भेटीनंतर घडामोडी? चर्चेला ऊत

राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटायला जाताना राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी भाजप-ताराराणी आघाडीच्या गनटेत्यांसह नगरसेवकांना रविवारी सोबत नेले होते. त्यानंतर सोमवारी लगेच चक्‍क राष्ट्रवादीचेच नगरसेवक फुटून थेट त्यांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले. अशा या योगायोगबद्दल चर्चा सुरू होती. 

गेल्या वर्षी डाव फसला, यावर्षी साधला...

गेल्या वर्षी काँग्रेसच्या रिना कांबळे यांना गैरहजर ठेवून भाजप-ताराराणी आघाडीने स्थायी समिती सभापती निवडणुकीत डाव टाकला होता; परंतु शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने त्यात त्यांना यश आले नाही. मात्र, यावर्षी थेट सभागृहातच राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक फोडून भाजप-ताराराणी आघाडीने डाव साधला. त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाईचा प्रश्‍न निर्माण झाल्यास भाजप-ताराराणी आघाडी त्यांना आपल्या गोटात घेणार असल्याचे सांगण्यात येते.