Sun, Aug 25, 2019 07:59होमपेज › Kolhapur › रात्रनिवारा शेडमध्ये ‘तळीरामां’चा मुक्काम

रात्रनिवारा शेडमध्ये ‘तळीरामां’चा मुक्काम

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 10 2018 1:06AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

महापालिकेच्या वतीने राजेंद्रनगर येथे उभारण्यात आलेल्या निराधारांसाठींच्या रात्र निवारा शेडमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. बहुतांश शेड बंद अवस्थेत असून, या ठिकाणी तळीरामांनी मुक्काम ठोकला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष आहे.  महापालिकेच्या वतीने निराधार लोकांसाठी राजेंद्रनगर परिसरात काही वर्षांपूर्वी रात्रनिवारा शेड उभारले आहेत. निवारा शेडमधील ‘डी’ विंगमधील तिसर्‍या मजल्याची मोठी दुरवस्था झालेली आहे. या ठिकाणी निराधार राहत नसल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. निवारा शेड बंद असून, दरवाजे, खिडक्या मोडल्या आहेत.

खोल्यांमध्ये कचर्‍याचे ढीग साचले असून, भिंतीवर प्रेमीयुगलांची मोठ्या अक्षरांत नावे लिहिलेली दिसत आहे. निवारा शेडमधील खोल्यांच्या भिंती पिचकार्‍या मारून घाण केल्या आहेत. तसेच रिकाम्या दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत. जुगार खेळाचे पत्ते पडलेले दिसतात. बर्‍याच दिवसांपासून या खोल्या बंद असल्याने या ठिकाणी दिवसाही तळीराम झोपलेले असतात. सध्या थंडीचे दिवस आहेत. निराधार लोकांना शहरापासून दूर असलेल्या निवारा शेडमध्ये जाऊन राहणे अवघड आहे.