Sun, Aug 25, 2019 03:38होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : प्राधिकरणाबाबत लेखी तक्रारी द्या

कोल्हापूर : प्राधिकरणाबाबत लेखी तक्रारी द्या

Published On: Jul 22 2018 1:01AM | Last Updated: Jul 22 2018 12:50AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

प्राधिकरणात समाविष्ट गावातील भविष्यतील नियोजनासाठी आपली बाजू भक्‍कमपणे मांडण्यासाठी तसेच प्राधिकरणासंदर्भात आगामी दिशा ठरविण्यासाठी बुधवारी (दि.25) होणार्‍या व्यापक बैठकीत संबंधित गावच्या गावकर्‍यांनी लेखी तक्रारी मांडाव्यात, असे अवाहन माजी आमदार संपतबापू पवार-पाटील यांनी प्राधिकरणासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत केले.  शासनाने कोल्हापूर शहरालगत असलेल्या 42 गावांचा समावेश करून प्राधिकरण लागू केले आहे. या प्राधिकारणाबाबत   चर्चा करण्यासाठी शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. 

माजी आमदार संपतबापू पवार-पाटील म्हणाले, अन्य ठिकाणी असे प्राधिकरण झाले आहे, त्याचा अभ्यास करून त्याबाबत होणारे फायदे-तोटे  तपासून आपण आपले धोरण ठरवू तसेच भविष्यातील नियोजनाच्या द‍ृष्टिकोनातून प्रयत्न करूया. आपण प्राधिकरणासंबंधात आपली बाजू भक्‍कमपणे मांडली तर आपल्याला न्याय मिळणार आहे. प्राधिकरण म्हणजे काय याची परिपूर्ण माहिती या गावातील ग्रामस्थांना होणे गरजेचे आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या अभ्यास करूनच याबाबत ठरवावी, अशी मागणी करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे  म्हणाले,  प्राधिकरण जाहीर झालेल्या 42 गावांतील बहुसंख्य लोकांना प्राधिकरण म्हणजे काय हेच कळाले नाही. त्यामुळे याची माहिती देऊन प्राधिकरणात समाविष्ट गावांचा विकास होत नसेल तर या विरोधात तीव्र आंदोलन उभे केले पाहिजे. 

नाथाजी पोवार म्हणाले, प्रथम प्राधिकरणाचा अभ्यास करूया, यापूर्वी झालेल्या प्राधिकरणाच्या अभ्यास करून याबाबत पुढील निर्णय घेऊ. प्रा जी. बी. मांगले म्हणाले, 17 ऑगस्ट 2017 रोजी प्राधिकरणाची सूचना निघाली, अकरा महिन्यांत शासनाने प्राधिकारणातून कोणता विकास केला याचे स्पष्टीकरण दिलं पाहिजे.  हे प्राधिकरण नसून एक प्रकारची हद्दवाढ आहे. प्राधिकारणामुळे ग्रामपंचायतीच्या मूळ योजना बंद पडल्या तर काय करायचे, असा प्रश्‍न अनेकांनी उपस्थित केला.  

मोरेवाडीचे अमर मोरे, वडणगे सरपंच सचिन चौगले, वाशीचे बी. ए. पाटील, उजळाईवाडीचे राजू माने, नारायण पोवार,  बाजीराव पाटील यांची भाषणे झाली. बैठकीस प्राधिकरणात समाविष्ट असलेल्या 42 गावांतील सरपंच, उपसरपंच तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.