होमपेज › Kolhapur › कोल्हापूर-गगनबावडा मार्ग बंद

कोल्हापूर-गगनबावडा मार्ग बंद

Published On: Jul 12 2019 1:49AM | Last Updated: Jul 12 2019 1:42AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

गुरुवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू असल्यामुळे कुंभी नदीचे पाणी मांडुकलीजवळ रस्त्यावर आले. परिणामी, कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील वाहतूक रात्री आठ वाजता बंद करण्यात आली. यामुळे करूळ, भुईबावडामार्गे कोकणात जाणारी वाहतूक फोंडा घाटमार्गे वळवण्यात आली आहे.

गगनबावडा तालुक्यातील टेकवाडी गावाला बेटाचे स्वरूप आले असून, नावेद्वारे वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पंचगंगेचेही पाणी गंगावेस-शिवाजी पूल रस्त्यावर गायकवाडवाड्यापर्यंत आले. जिल्ह्यात उद्या शुक्रवारीही अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर दिवसभर कायम होता. शहर आणि परिसरात सकाळपासून संततधार सुरू होती. सकाळी काही काळ तर धुवाँधार पाऊस कोसळत होता. या पावसाने शहरातील अनेक रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले. जागोजागी पाणी साठल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली. जोरदार पावसाने जनजीवनही विस्कळीत झाले. दुपारनंतर मात्र शहरात पावसाने विश्रांती घेतली. अधूनमधून कोसळणारी सर वगळता पावसाची चांगलीच उघडीप होती.

जिल्ह्यात मात्र सर्वदूर दमदार पाऊस सुरू होता. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तर अतिवृष्टीच सुरू होती. जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत राहिली. कोल्हापूर-बाजारभोगाव मार्गावर पाणी आल्याने तो मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. काखे-मांगले मार्गावरील पुलावर पाणी आल्याने हा मार्गही बंद झाला. गोठे पुलावरील पाण्याची पातळी आज वाढली. यामुळे धामणी खोर्‍यातील दहाहून अधिक गावांचा थेट संपर्क तुटला. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरही सायंकाळपर्यंत ठिकठिकाणी पाणी रस्त्यालगत आले होते. रात्री आठच्या सुमारास मार्गेवाडी आणि मांडुकलीजवळ रस्त्यावर पाणी आले. पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला. कळे, साळवण आणि गगनबावड्यासह वैभववाडी येथील नियंत्रण कक्षास वाहतूक बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. यामुळे या मार्गावरील कोकणात जाणारी आणि कोकणातून येणारी वाहतूक फोंडा घाटमार्गे वळवण्यात आली.

जिल्ह्यातील 150 गावांचा संपर्क तुटला; 26 बंधारे पाण्याखाली

जिल्ह्यात आज पावसाचा जोर वाढला. यामुळे बहुतांशी नद्यांच्या पाणी पातळीत आज झपाट्याने वाढ झाली. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत गेल्याने आणखी 26 बंधारे पाण्याखाली गेले. पाण्याखाली गेलेल्या जिल्ह्यातील बंधार्‍यांची संख्या सायंकाळपर्यंत 71 वर पोहोचली. बंधार्‍यावर पाणी आल्याने जिल्ह्यातील 150 हून अधिक गावांचा थेट संपर्क तुटला आहे. गगनबावडा तालुक्यातील टेकवाडीला यंदाही बेटाचे स्वरूप आले. नदीच्या पाणी पातळीत दिवसभर वाढ होत गेल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी अखेर यांत्रिकी बोटीचा वापर करावा लागला. तहसील कार्यालयाच्या वतीने तातडीने बोट उपलब्ध करून देण्यात आली. दरम्यान, गावाला पाण्याचा वेढा पडल्याने वैद्यकीय पथकाने गावात भेट देऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली. पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यात आली, पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणार्‍या औषधांचीही पाहणी करण्यात आली.

पंचगंगेची पातळी 36.8 फुटांवर

बुधवारी रात्रीपासून गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत पंचगंगेची पाणी पातळी 34.10 फुटांवर स्थिर होती. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात झालेल्या पावसाने पंचगंगेच्या पातळीत दिवसभर वाढ होत गेली. राधानगरी धरणातूनही वीजनिर्मितीसाठी सोडण्यात येणार्‍या पाण्याचा विसर्ग 400 वरून 1,200 क्युसेक्सपर्यंत वाढवण्यात आला. यामुळे पंचगंगेची पातळी रात्री नऊ वाजता 36.8 फुटांपर्यंत वाढली. दिवसभरात पंचगंगेच्या पातळीत दोन फुटांनी वाढ झाली. पंचगंगेचे पाणी गंगावेस-शिवाजी पूल रस्त्यावर गायकवाडवाड्यापर्यंत आले. पावसाचा जोर कायम राहिला, तर पंचगंगा नदी शनिवारपर्यंत इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे.

दहा धरणांत 100 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस

जिल्ह्यातील सर्वच धरणांत गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत अतिवृष्टी झाली. दहा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात 100 मि.मी.पेक्षा जादा पाऊस झाला. जोरदार पावसाने धरणांच्या पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ सुरू आहे. राधानगरी धरण गुरुवारी सायंकाळपर्यंत 60 टक्के भरले होते. दूधगंगा (31 टक्के) वगळता सर्वच धरणे 40 टक्क्यांहून अधिक भरली आहेत.

आजही अतिवृष्टीचा इशारा

जिल्ह्यात विशेषत: पश्‍चिमेकडील भागांत शुक्रवारीही अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गुरुवारीही अनेक भागांत अतिवृष्टीसदृश पाऊस झाला. यामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यातील पाऊस

जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 24 तासांत झालेला पाऊस (मि.मी.मध्ये). गगनबावडा 122, आजरा 85.75, राधानगरी 70.58, चंदगड 69.50, शाहूवाडी 54, पन्हाळा 51.86, भुदरगड 47.80, करवीर 29.64,  कागल 26.57, गडहिंग्लज 23, हातकणंगले 6.88, शिरोळ 6.86, सरासरी 49.53 मि.मी.