Tue, Nov 19, 2019 11:24होमपेज › Kolhapur › कोल्हापूर-गगनबावडा मार्ग खुला

कोल्हापूर-गगनबावडा मार्ग खुला

Published On: Jul 13 2019 1:53AM | Last Updated: Jul 13 2019 1:53AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात शुक्रवारी पावसाचा जोर ओसरला. शहर आणि परिसरात दिवसभर पावसाची उघडीप होती. जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी कमी होऊ लागली असून, सात बंधार्‍यावरील पाणी उतरले आहे. रस्त्यावर आलेले पाणी कमी झाल्याने कोल्हापूर-गगनबावडा मार्ग शुक्रवारी सकाळपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. 

पावसाने विश्रांती घेतली असली, तरी पंचगंगेच्या पाणी पातळीत संथ वाढ सुरूच आहे. रात्री आठ वाजेपर्यंत पंचगंगेची पातळी 37.9 पर्यंत गेली होती. पंचगंगेचे पाणी शुक्रवारी रात्री गायकवाड वाड्यापुढे जामदार क्लबजवळ पोहोचले. यामुळे गंगावेस-शिवाजी पूल या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

गेले चार-पाच दिवस असणारा पावसाचा जोर शुक्रवारी कमी झाला. शहर आणि परिसरात तर सकाळपासूनच पावसाने उसंत घेतली होती. काही काळ कडकडीत ऊनही पडत होते. दिवसभरात कोसळलेली एखाद-दुसरी सर वगळता पावसाची उघडीपच होती. जिल्ह्यातही पाऊस कमी झाला. सकाळपासूनच अनेक भागात पावसाने विश्रांती घेतली होती. पाऊस थांबल्याने दोन दिवस विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आले.

मांडुकली, मार्गेवाडीजवळ पाणी आल्याने कोल्हापूर-गगनबावडा मार्ग गुरुवारी रात्री वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पहाटे या मार्गावर आलेले पाणी ओसरले. यामुळे हा मार्ग खुला झाला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने सकाळी सात वाजल्यापासून त्यावरून वाहतूक सुरू केली. जिल्ह्यातील 71 बंधारे पाण्याखाली होते. त्यापैकी भोगावती नदीवरील शिरगाव, तुळशी नदीवरील आरे व बाचणी, वारणा नदीवरील माणगाव तर कुंभी नदीवरील शेणवडे, सांगशी आणि आसळज हे सात बंधारे वाहतुकीसाठी खुले झाले. शुक्रवारी रात्रीपर्यंत जिल्ह्यातील 64 बंधार्‍यांवर अद्याप पाणी असल्याने त्यावरील वाहतूक बंदच आहे.

धरण क्षेत्रात पावसाचा जोर काहीसा कमी झाला. मात्र, गेल्या 24 तासांत शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत बहुतांशी सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली. या पावसाने धरणातील पाणीसाठ्यात वाढ सुरूच असून, राधानगरी धरण 65 टक्के भरले. तुळशीत 53 टक्के, तर दूधगंगेत 35 टक्के पाणीसाठा झाला. वारणा धरण शुक्रवारी रात्रीपर्यंत निम्मे भरले होते. पंचगंगेवरील राजाराम बंधार्‍यावरून सध्या 44 हजार 207 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे कोल्हापूरपुढेही पंचगंगेच्या पातळीत वाढ सुरू आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणात सध्या 10 टीएमसी पाण्याची आवक होत असून, धरणात 71.39 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातून सध्या केवळ 128 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.