होमपेज › Kolhapur › कोल्हापूर-गगनबावडा मार्ग पाण्यात

कोल्हापूर-गगनबावडा मार्ग पाण्यात

Published On: Jul 16 2018 1:14PM | Last Updated: Jul 16 2018 1:14PMकळे : वार्ताहर

पश्‍चिम पन्हाळ्यातील कळे परिसर, धामणी खोर्‍यात व गगनबावडा तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कुंभी व धामणी नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर गगनबावडा तालुक्यातील लोंघे-किरवे, मांडुकली, मार्गेवाडी व खोकुर्ले येथे पुराचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दरम्यान, तांदूळवाडी (ता. पन्हाळा) व तिसंगीपैकी टेकवाडी (ता. गगनबावडा) या गावांना बेटाचे स्वरूप प्राप्‍त झाले आहे.

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर मांडुकली येथे सोमवारी पहाटे पुराचे पाणी आले. त्यानंतर सकाळी मार्गेवाडी व खोकुर्ले येथे पुराचे पाणी आले. सकाळी अकराच्या सुमारास लोंघे-किरवे दरम्यान पुराचे पाणी आले. सायंकाळी सहाच्या सुमारास या ठिकाणी सुमारे दोन फूट पाणी पातळी होती. तांदूळवाडी-गोठे दरम्यान कुंभी नदीचे पाणी सुमारे चार ते पाच फूट आले आहे. तसेच तांदूळवाडी व बालेवाडी (ता. गगनबावडा) दरम्यानच्या ओढ्यावर पुराचे पाणी आल्याने तांदूळवाडी गावाला बेटाचे स्वरूप आले असून या ठिकाणचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. तिसंगीपैकी टेकवाडी गावालाही बेटाचे स्वरूप आले. मार्गेवाडी (ता. गगनबावडा) नवीन वसाहतीशेजारी पावसामुळे माती घसरल्यामुळे या ठिकाणी तहसीलदार रामसंग चव्हाण यांनी भेट दिली. 

जांभळी खोर्‍यातील मानवाड (ता. पन्हाळा) पांडुरंग कृष्णात गुरव व राजेंद्र गुरव या दोघांच्या घरामध्ये पाणी आल्याने या दोन कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान, कोल्हापूर-गगनबावडा राज्य मार्ग बंद झाल्याने कळे पोलिसांनी कळे येथे व गगनबावडा पोलिसांनी लोंघे येथे सर्व वाहने रोखली आहेत. कळे-मरळी दरम्यान पाण्याची पातळी रस्त्याच्या खाली एक ते दीड फूट आहे.