Sat, Aug 24, 2019 22:12होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : दवाखान्यात जेवणाचा डब्बा पोहोचविण्याची मोफत सेवा

कोल्हापूर : दवाखान्यात जेवणाचा डब्बा पोहोचविण्याची मोफत सेवा

Published On: Jul 21 2018 1:30AM | Last Updated: Jul 21 2018 1:03AMकोल्हापूर : सागर यादव 

कोल्हापूरला दवाखान्यात जेवणाचा डब्बा द्यायला कोण नाही? काळजी करू नका, बस्स... मला एक फोन करा आणि रहा बिनधास्त... तुमचा जेवणाचा डब्बा दवाखान्यात मोफत पोहोच होईल. यावर विश्‍वास बसत नाही ना, पण ही गोष्ट खरी आहे... ही अनोखी रुग्णसेवा व्हॉटस् अ‍ॅपच्या माध्यमातून करतोय करवीर तालुक्यातील वरणगे पाडळीचा जितू...

“कोणा रुग्णाला दवाखान्यात जेवणाचा डब्बा पोहोचवायचा असेल तर मला सांगा”, असे जाहीर आवाहन करून सोबत आपला मोबाईल क्रमांक देण्याबरोबरच रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णाची सेवा आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदतीची कृतिशील समाजसेवा जितेंद्र पंडित पाटील  गेल्या काही वर्षांपासून अखंडपणे करीत आहे. त्यामुळे जितू ‘दाम करी काम’ याला अपवाद ठरलाय.

जितेंद्र कोल्हापुरातील एका बँकेत नोकरी करीत असून गावातील इतर तरुणांप्रमाणे तोही शिवराज्य मंच या ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांसह अनेक व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर सक्रिय आहे. सोशल मीडियावरील सर्वात प्रभावी माध्यम असणार्‍या व्हॉट्स अ‍ॅपचा वापर केवळ ‘गुड मॉर्निंग, गुड नाईट, काय खाल्लं-काय पिलं ?’, यासह लोकांना भडकाविणार्‍या पोस्ट टाकण्याऐवजी या माध्यमाचा उपयोग विधायक कार्यासाठी कसा करता येईल, याचे आदर्श उदाहरण म्हणजे जितू. केवळ लोकांना उपयोगी पडेल अशी पोस्टस् जितेंद्रने व्हायरल केली नाही तर त्याला कृतिचीही जोड दिली. गावातून कोल्हापुरात कोणत्याही रुग्णाला अगदी वेळेत घरचा जेवणाचा डब्बा विनासायास पोहोच होत आहे. त्यामुळे  गावात जितू सार्‍यांचाच लाडका बनला आहे.

जितेंद्र दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत कोल्हापुरातील बँकेत नोकरीसाठी येतो. सकाळी तो व्हॉट्स अ‍ॅपवरून आपल्या ग्रुपवर मेसेज करतो,‘ कोणाला कोल्हापुरात रुग्णालयात जेवणाचा डब्बा पोहोचवायचा असेल तर मला सांगा” त्यानुसार गावातील कोणाचा रुग्ण दवाखान्यात असेल तर ते जितेंद्रकडे जेवणाचा डब्बा नेऊन देतात. जितेंद्र संबंधित रुग्णाला रुग्णालयात जाऊन डब्बा पोहोचवतो. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचा  वेळ-श्रम आणि आर्थिक बचतही होत आहे. शिवाय जितेंद्रलाही आपल्या कामातून रुग्णाची सेवा केल्याचा आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत केल्याचा आनंद मिळतो. 

समाजात एकीकडे प्रत्येकजण केवळ स्वत:चा विचार करत असताना दुसरीकडे समाजाप्रती आपणही काहीतरी देणे लागतो. या भावनेने जितेंद्रसारखे आदर्श काम करणार्‍या युवकांची आज समाजाला गरज आहे.

पूरपरिस्थीतीतही विशेष मदत...

अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थीती निर्माण होते. परिणामी शिवाजी पुलाकडील पन्हाळा रोड वाहतुकीस बंद होतो. त्यामुळे वरणगे पाडळीतील लोकांना वरणगे-यवलूज-खुपीरे-साबळेवाडी-दोनवडे फाटा-बालिंगे पूल-फुलेवाडी मार्गे कोल्हापुरात यावे लागते. कोल्हापूर -वरणगे अंतर 10 कि.मी. आहे. मात्र, पूरपरिस्थतीत वरणगेतील लोकांना सुमारे दुप्पट म्हणजेच 22 कि.मी. प्रवास करावा लागतो. अशावेळी जितेंद्रची ही मदत आणखी मोलाची ठरते. परिणामी  त्याच्या या सेवेचा अनेक गरजूंना उत्तम लाभ होत आहे.