Sat, Jul 20, 2019 15:23होमपेज › Kolhapur › मिळकतधारक वाढवा, घरफाळा वाढ नको

मिळकतधारक वाढवा, घरफाळा वाढ नको

Published On: Feb 28 2018 1:57AM | Last Updated: Feb 28 2018 1:56AMकोल्हापूर : प्रतिनिधी

घरफाळावाढीबाबतच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी बोलावलेली महापौर, गटनेता व महापालिका प्रशासनाची बैठक निष्फळ ठरली. आहे त्या मिळकतधारकांवर कराचा बोजा वाढवण्यापेक्षा प्रशासनाने मिळकतधारकांचा शोध घेऊन घरफाळा लागू केल्यास महापालिकेला अपेक्षित उत्पन्‍न मिळेल, असे मत गटनेत्यांनी मांडले. याबाबत पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी महापौर सौ. स्वाती यवलुजे होत्या. महापालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेसमोर घरफाळावाढीचा प्रस्ताव ठेवला होता;  पण गटनेत्यांना विश्‍वासात न घेता थेट घरफाळावाढीचा प्रस्ताव सभेसमोर ठेवल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्‍त करून, सभा तहकूब केली.

यासंदर्भात मंगळवारी ही बैठक घेण्यात आली. नगरसचिव दिवाकर कारंडे यांनी कोल्हापूर महापालिकेने भांडवली मूल्यावर कर आकारणी 2011-12 सालापासून केल्याचे सांगितले. मागील सात वर्षांत कोणतीही करवाढ केलेली नाही. नव्याने भांडवली मूल्यावर कर आकारणी करताना   वैयक्‍तिक मालकांसाठी .25 टक्के, तर भाडेतत्त्वारील मिळकतींसाठी .50 टक्के घरफाळावाढ प्रस्तावित करण्यात आल्याचे सांगितले. आयुक्‍त अभिजित चौधरी यांनी, 

 भांडवली मूल्यावर 

आधारित प्रणाली आपण वापरल्याने आता घरफाळावाढ करताना रेडीरेकनर दराप्रमाणे भाडेतत्त्वावरील मिळकतींवर घरफाळा आकारणी करण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले. ज्या मिळकती भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत त्यांच्याकडून आकारण्यात येणार्‍या भाड्यावर घरफाळा आकारला जातो.  घरफाळा लागू होऊ नये म्हणून अनेक मिळकती या भाडेतत्त्वावर दिल्या असल्याची माहिती लपवली जात आहे. त्यामुळे महापालिकेचे नुकसान होत आहे. रेडीरेकनर प्रणालीने या मालमत्तांवर घरफाळा लावल्यास त्याच्या नोंदी महापालिकेकडे होणार आहेत, असे सांगितले. त्यामुळे गटनेत्यांनी या प्रस्तावावर विचार करावा, असे सुचवले.

मिळकतधारक वाढवा

यावेळी गटनेता शारंगधर देशमुख यांनी, महापालिकेने आपल्याकडे असणार्‍या मिळकतींची माहिती घ्यावी. कारण, केवळ तूट भरून काढण्यासाठी घरफाळावाढीचा प्रस्ताव मान्य करणे योग्य होणार नाही. भाडेतत्त्वावरील मिळकतींवर 70 टक्के घरफाळा लागू होत आहे. त्यामुळे महापालिकेने घरगुती व व्यावसायिक असा फरक न करता सरसकट .25 टक्के घरफाळा आकारणी करावी, अशी मागणी केली. आमचा दरवाढीला विरोध नाही; पण भाडेतत्त्वावरील मिळकतींना घरफाळा कमी होणे गरजेचे आहे. त्यावर प्रशासन जोपर्यंत निर्णय घेत नाही, तोपर्यंत सभेत या प्रस्तावावर चर्चा होणार नाही, असे  त्यांनी स्पष्ट केले.

सत्यजित कदम म्हणाले, भाडेतत्त्वावरील मिळकतींवर  रेडीरेकनरप्रमाणे घरफाळा लागू करताना प्रत्येक भागाचा रेडीरेकनर दर आहे. महाद्वार रोडवरच्या मुख्य रस्त्यावरील रेडीरेकनर व आतील बाजूला असणारा दर एकच असणार; पण दोघांच्या व्यवसायात फरक असणार, अशा ठिकाणी रेडीरेकनर दराने घरफाळा लावणे अन्यायकारक होणार आहे.
परिवहन सभापती राहुल चव्हाण, भूपाल शेटे, नियाज खान यांनी, अनेक मिळकतींवर मोठे टॉवर्स उभारण्यात आले आहेत. महापालिकेकडे अशा मिळकतींच्या नोंदी 40 आहेत. प्रत्यक्षात 538 मिळकती आहेत; पण त्यांची महापालिकेकडे नोंद नाही. त्यामुळे अपेक्षित घरफाळा मिळत नसल्याचे सांगितले. या बैठकीला उपमहापौर सुनील पाटील, सुरेखा शहा, वनिता देठे, अशोक जाधव, उपायुक्‍त मंगेश शिंदे, धनंजय आंदळे उपस्थित होते.

मिळकतींची तफावत

या बैठकीत महापालिका प्रशासनाकडे घरफाळा मिळकतधारकांच्या असणार्‍या नोंदी व शारंगधर देशमुख यांनी दिलेल्या नोंदीच्या आकडेवारीत मोठी तफावत दिसून आली. दिवाकर कारंडे यांनी  महापालिकेकडे 10 हजार 180 मिळकतींची नोंद असल्याचे सांगितले. यामध्ये 4,700 घरगुती मिळकतींचा समावेश आहे. शारंगधर देशमुख यांनी वीज वितरण कंपनीकडे असणार्‍या मीटरचा आधार घेऊन 27 हजार 420 मिळकती असल्याचे सांगितले. यामध्ये 17 हजार मिळकतींची तफावत दिसून आली. तसेच भाडेतत्त्वावर असणार्‍या मिळकतींची संख्या अंदाजे 30 हजारच्या आसपास आहे; पण यांची नोंदच महापालिकेत नाही. किमान या मिळकतींच्या नोंदी झाल्यास महापालिकेला अपेक्षित उत्पन्‍न मिळू शकते, असे सांगितले.