Tue, May 21, 2019 00:39होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : ‘त्या’  कारखान्याने रक्‍कम केली परत!

कोल्‍हापूर : ‘त्या’  कारखान्याने रक्‍कम केली परत!

Published On: Jul 21 2018 1:30AM | Last Updated: Jul 21 2018 12:40AMकुडित्रे ः प्रतिनिधी

एफ.आर.पी. पेक्षा जादा दिलेली आणि एफ.आर.पी. ची थकबाकी देताना दुसर्‍या हप्त्यातून वसूल केलेली प्रती टन 102 रुपयांची वसूल केलेली रक्‍कम दत्त डालमिया आसुर्ले पोर्ले साखर कारखान्याने संबंधित ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिली आहे. यामुळे ऊस उत्पादकांना त्यांच्या पुढील बिलातून वसूल केलेले 1 कोटी 44 लाख रुपये परत खात्यावर वर्ग झाले आहेत. तर 31 लाख रुपयांची  जेव्हा ऊस येईल तेव्हा  होणारी वसुली थांबली आहे. तर सर्वांनाच 2800 अधिक 100 रुपये प्रती टन म्हणजे 2900 रुपयांनी बिले मिळण्याचा मार्ग सुलभ झाला आहे.

दै. ‘पुढारी’ने प्रसिद्ध केले वृत्त

पश्चिम महाराष्ट्रातील एका खासगी साखर कारखान्याने ठरलेल्या फॉर्म्युल्यालाच हरताळ फासत एफ.आर.पी. पेक्षा जादा दिलेली रक्‍कम वसूल करायला सुरुवात केली आहे. साखर कारखानदारीच्या इतिहासात दिलेले बिल परत वसूल करण्याचा प्रकार पहित्यांदाच घडला आहे. ऊस उत्पादक मात्र हबकले आहेत. असे वृत्त  दै. ‘पुढारी’ ने 6 जुलैच्या अंकात प्रसिद्ध केले होते.

या कारखान्याची नेट एफ.आर.पी. ( तोडणी वाहतूक खर्च वजा जाता) प्रती टन 2798 रुपये आहे. ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार त्यांनी 2798 ऐवजी 2800 रुपये एफ.आर.पी. ग्राह्य धरुन 2800 अधिक 100 म्हणजे प्रती टन 2900 रुपयांप्रमाणे उचल देण्यास सुरुवात केली. कारखाना 5 नोव्हेंबरला सुरू झाला. 5 नोव्हेंबर ते 17 डिसेंबरपर्यंतची बिले 2900 रुपयांप्रमाणे वर्ग केली. पुढे सर्व साखर कारखान्याप्रमाणे 18 डिसेंबरपासून कारखाना संपेपर्यंतची बिले 2500 रुपयांप्रमाणे दिली. पुढे आंदोलनानंतर एफ.आर.पी. प्रमाणे उरलेला फरक प्रती टन 298 रुपये 149 अधिक 149 रुपये अशा दोन टप्प्यात देण्याचे मान्य केले. सर्वांना 149 प्रमाणे बिले दिली . पण दुसरा 149 चा हप्ता देताना ज्यांचा ऊस 5 नोव्हेंबर ते 17 डिसेंबर या काळात आला व त्यांना एफ.आर.पी. पेक्ष जादा दिलेले 102 रुपये पुढे आलेल्या बिलातून वसूल करून घेतले होते.

ही वसूल केलेली रक्‍कम परत करावी व तोडणी वाहतूक खर्च वाढीचा निर्णय मागे घ्यावा आणि तोडग्याप्रमाणे पूर्ववत प्रती टन 2900 रुपयांप्रमाणे बिले द्यावीत म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पन्हाळा तालुका अध्यक्ष विक्रम पाटील, आसुर्ले पोर्ले शाखाध्यक्ष रामराव चेचर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले होते. 19 जुलैपूर्वी कारवाई न झाल्यास मोर्चा काढण्याचा ईशारा देण्यात आला होता. कारखान्याने ही रक्‍कम सिस्टीममधील तांत्रिक दोषामुळे वसूल झाली असून 19 जुलैपर्यंत वसूल झालेल्या रकमा खात्यावर जमा करू असे, आश्वासन युनिट हेड टी.एन. सिंह यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानुसार ही वसूल रक्‍कम संबंधित ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केली असल्याचे दगडू गुरवळ, शिवाजी शिंदे, कृष्णात जमदाडे , विक्रम पाटील,उमेश शेलार, नारायण पाटील, बाबुराव शेवडे, धोंडीराम पाटील, बळीराम पाटील यांनी सांगितले.