Mon, Aug 19, 2019 09:54होमपेज › Kolhapur › सायबर गुन्हेगारीत राज्य अव्वल नंबरवर!

सायबर गुन्हेगारीत राज्य अव्वल नंबरवर!

Published On: Feb 19 2018 1:22AM | Last Updated: Feb 19 2018 12:00AMकोल्हापूर : सुनील कदम

राज्यात सायबर गुन्हेगारीचा इतक्या वेगाने फैलाव होऊ लागला आहे की या बाबतीत महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान मिळविलेले आहे. राज्यातील बहुतांश मोठी शहरे सायबर गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत चालली असून ग्रामीण भागातही या ‘तंत्राचा’ वेगाने विस्तार होताना दिसत आहे. विशेष चिंताजनक बाब म्हणजे 18 ते 35 या वयोगटातील तरुण पिढीने या गुन्हेगारी तंत्रात ‘विशेष प्रावीण्य’ मिळविल्याचे दिसून येत आहे. आर्थिक फसवणूक, सामाजिक व वैयक्‍तिक बदनामी, अश्‍लीलता, धमकी आदी सर्व प्रकारच्या सायबर गुन्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.

गेल्या काही वर्षांत माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा प्रचंड वेगाने विस्तार होत आहे आणि त्याच वेगाने सायबर गुन्हेगारीचादेखील विस्तार होताना दिसत आहे. प्रामुख्याने राज्यातील मुंबई शहर, उपनगरे, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर या शहरांना सायबर गुन्हेगारीने चांगलाच विळखा घातल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येत आहे. 2013 साली राज्यात दाखल झालेल्या सायबर गुन्ह्यांची संख्या ही केवळ 907 इतकी होती, मात्र सरत्या वर्षात म्हणजे 2017 मध्ये हा आकडा पाच हजारांच्यावर जाऊन पोहोचला आहे. या बाबतीत गेल्या दोन वर्षांत राज्याने उत्तर प्रदेश आणि कर्नाटकला मागे टाकून अव्वल स्थान पटकावलेले आहे.

सायबर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 आणि भारतीय दंडसंहिता या दोन्ही प्रकारचा वापर केला जातो.  सायबर गुन्ह्यांची उकल करणे हे अत्यंत जिकिरीचे आणि अत्यंत वेळखाऊ काम असल्यामुळे अनेकवेळा किरकोळ किरकोळ स्वरूपाच्या सायबर गुन्हेगारीकडे पोलिस यंत्रणेकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे, त्यामुळे राज्यात दाखल झालेल्या सायबर गुन्ह्यांच्या तुलनेत तपास पूर्णत्वास गेलेल्या प्रकरणांची संख्या कमी दिसते. त्यामुळे या प्रकारणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्याही त्या मानाने कमी असलेली दिसून येते. याचा नेमका गैरफायदा सायबर गुन्हेगारांना मिळताना दिसत आहे.

आजपर्यंत पोलिस यंत्रणेने तडीस लावलेल्या अनेक सायबर गुन्ह्यांमध्ये संबंधितांचे निकटचे लोकच आरोपी असल्याचेही निदर्शनास आलेले आहे. नातेवाईक, परिचित, नोकर, कार्यालयीन सहकारी, जवळचे मित्र-मैत्रिणी, कार्यालयीन सहकारी यांसारख्या लोकांनीच गुन्हे केल्याचे उघडकीस आलेले आहे. आर्थिक स्वरूपाच्या काही सायबर गुन्ह्यांमध्ये मात्र अपरिचित किंवा परदेशस्थ लोकांनी गुन्हे केल्याचे दिसून येते.

राज्यातील युवापिढी माहिती तंत्रज्ञानात वेगाने प्रगती करीत आहे, ही बाब अभिमानास्पद असली तरी हीच पिढी मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हेगार म्हणून वेगाने पुढे येताना दिसणे, ही बाब आत्मचिंतन करायला लावणारी आहे. कारण राज्यात आजपर्यंत सायबर गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी जवळपास 90 टक्के आरोपी हे 18 ते 35 या ‘तरुणतुर्क’ वयोगटातील आहेत. त्याचप्रमाणे सायबर अश्‍लिलतेसारख्या अनेक गुन्ह्यांमध्ये साठी पार केलेले काही ‘म्हातारे अर्कही’ आढळून आलेले आहेत. सायबर गुन्हेगारी वर्तुळात पुरुषांच्या मानाने महिलांचा सहभाग हा अत्यंत अल्प स्वरूपाचा दिसून आलेला आहे. आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे अनेक अल्पवयीन मुलेसुद्धा विनाकारण किंवा केवळ गंमत म्हणून सायबर गुन्हेगारी विश्‍वात डोकावताना दिसत आहेत, ही बाब पालकांच्याद‍ृष्टीने चिंताजनक स्वरूपाची आहे.