Tue, Mar 26, 2019 01:33होमपेज › Kolhapur › हृदयाची दुर्मीळ शस्त्रक्रिया करून वृद्धेला जीवदान

हृदयाची दुर्मीळ शस्त्रक्रिया करून वृद्धेला जीवदान

Published On: Jan 15 2018 1:48AM | Last Updated: Jan 14 2018 11:00PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

हृदयावर अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून एका वृद्धेला जीवदान देण्यात येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया असून, या शस्त्रक्रियेची केस स्टडी युरोपीयन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी या संस्थेच्या वतीने होणार्‍या जागतिक परिषदेत मांडण्यात येणार आहे, अशी माहिती सीपीआरमधील हृदयशस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. अक्षय बाफना यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्रीमती लक्ष्मी कृष्णा खतकर (वय 70, रा. करडवाडी, ता. भुदरगड) असे शस्त्रक्रिया केलेल्या वृद्धेचे नाव  आहे. 

डॉ. बाफना म्हणाले, खतकर यांना डिसेंबर महिन्यात हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामध्ये त्यांच्या हृदयातील काही भाग खराब झाला होता, छिद्रही पडले होते. त्यांनी खासगी दवाखान्यात दाखवले, तेथील डॉक्टरांनी त्यासाठी 10 लाखांचा खर्च लागेल, असे सांगितले. इतके पैसे नसल्याने व सीपीआरमध्ये चांगले उपचार होऊ शकतात, असे सांगितल्यानंतर त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. डॉ. बाफना म्हणाले, लक्ष्मी यांच्या तपासण्या केल्या असता हृदयाचा काही भाग खराब झाला असल्याचे आढळून आले, अशा अवस्थेत त्यांचे प्राण वाचविणे हे आव्हान होते.

त्यासाठी एक लाखापेक्षा जास्त खर्च येणार होता. यासंदर्भात रुग्णांच्या नातेवाईकांना याची माहिती दिली. दरम्यान, महात्मा जोतिबा फुले आरोग्य विमा योजनेतून ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय सीपीआर प्रशासनाने घेतला; पण अशी शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारे मशिन हे महागडे होते, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शासनाच्या निधीतून ते मशिन उपलब्ध करून दिले. त्यानंतर शरीराची कोठेही चिरफाड न करता अतिसुक्ष्म दुर्बिणीच्या साहाय्याने पायाच्या आणि मानेच्या नसेतून हृदयापर्यंत मोठ्या कौशल्याने लक्ष्मी यांच्या हृदयाला पडलेले छिद्र बंद करण्यात यश  आले. 

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद म्हणाले, जन्मलेल्या बाळाच्या हृदयाला छिद्र असल्याचे आढळून येते; पण 70 वर्षांच्या व्यक्तीच्या हृदयाचा पडदा खराब होणे, ही दुर्मीळ घटना घडत असते. अशा घटनामध्ये रुग्ण 90 टक्के बचावण्याची शक्यता कमी असते; पण सीपीआरमधील हृदयरोगतज्ज्ञ विभागाचे प्रमुख डॉ. अक्षय बाफना व त्यांच्या सहकार्‍यांनी ही अत्यंत अवघड शस्त्रक्रिया करून सीपीआरचे नाव उंचावण्याचा प्रयत्न केला  आहे.  पत्रकार परिषदेला वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, डॉ. रणजित जाधव, डॉ. साजिद मुल्ला, डॉ. रणजित पवार, डॉ. हेमलता देसाई आदी उपस्थित होते.