Thu, Jul 18, 2019 10:56होमपेज › Kolhapur › मागण्यांची पूर्तता न केल्यास बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार

मागण्यांची पूर्तता न केल्यास बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार

Published On: Feb 03 2018 2:21AM | Last Updated: Feb 02 2018 11:44PMकोल्हापूर : प्रतिनिधी

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी शुक्रवारी (दि.2) शिक्षकांनी शासनाच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन केले. दोन दिवसांत शासनाने मागण्यांची पूर्तता न केल्यास बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे. राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या आदेशानुसार जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या नेतृत्वाखाली टप्प्या-टप्प्याने आंदोलन सुरू आहे.

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी शिक्षकांना रस्त्यावर उतरावयास लावणार्‍या शासनाचा धिक्‍कार असो, शिक्षणमंत्री हाय..हायच्या घोषणा दिल्या. त्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांनी शिक्षकांना ताब्यात घेऊन एक तासानंतर सोडून दिले. यावेळी शिक्षक व पोलिसांत झटापट  झाली.   गेल्या 15 वर्षांपासून कायम विनाअनुदानित शिक्षक बिनपगारी व तुटपुंज्या वेतनावर काम करीत आहेत. नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षकांना अद्याप जुनी पेन्शन योजना लागू झालेली नाही. 2003 ते 2009

याकालावधीतील 935 शासनमान्य दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यातील वाढीव पदांना अधिवेशन संपण्यापूर्वी तरतूद झाली पाहिजे. 25 हजार शिक्षक शासकीय वेतनापासून वंचित असल्याने तणावाखाली जगत आहेत. संचमान्यतेमधील त्रुटी कमी करण्याऐवजी शिक्षक संख्या कमी केली जात आहे. 2011-12 पासून प्रस्तावित पदांना शासन मंजुरी तत्काळ मिळाली पाहिजे. तासिका, अर्धवेळ कार्यभारावरील शिक्षकांना अभियोग्यता चाचणीतून वगळ्यात यावे.

सर्वांना विनाअट निवडश्रेणी देण्यात यावी. माहिती तंत्रज्ञान विषय अनिवार्य करावा आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. आंदोलनात प्रा. अविनाश तळेकर, प्रा.टी.के.सरगर, प्रा.सी.व्ही.जाधव, बी.जे.माने, एम.के.परीट, शिवाजी होडगे, अरविंद शेळके, कांचन पाटील, ए.बी.दळवी, एस.आय.मोरे, विजय मेटकरी यांच्यासह सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षक सहभागी झाले  होते.