Tue, Mar 19, 2019 15:51होमपेज › Kolhapur › तळ्यांचं-कमळांचं गाव कोल्हापूर..!

तळ्यांचं-कमळांचं गाव कोल्हापूर..!

Published On: Feb 02 2018 1:32AM | Last Updated: Feb 02 2018 1:19AMजगभर 2 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ किंवा जलमयभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. तलाव तसेच त्याच्या आसपासचा दलदलयुक्‍त भाग यांचा समावेश पाणथळ जागांमध्ये होतो. यानिमित्ताने कोल्हापुरातील पूर्वीच्या व आत्ताच्या तलावांच्या स्थितीचा थोडक्यात घेतलेला आढावा...

कोल्हापूर म्हणजे प्राचीन, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा लाभलेलं गाव. कोल्हापूर तळ्यांचं गाव. या तलावांमध्ये अनेक रंगीबेरंगी कमळे उगवायची. कोल्ल म्हणजे कमळ आणि याच नावावरून कोल्हापूर या नावाची उत्पत्ती झाली असावी. आजच्या आणि पूर्वीच्या कोल्हापूरचा उल्लेख असलेल्या कागदपत्रांमध्ये, संदर्भ साधनांमध्ये, नकाशांमध्ये एकत्रिपणे 31 तलाव-तळी  यांचे उल्लेख मिळतात. ते पुढीलप्रमाणे -

1. रंकाळा, 2. पद्माळा, 3. कळंबा, 4. राजाराम , 5. शिवाजी विद्यापीठ तलाव, 6.  न्यू पॅलेस तलाव,  7. कोटीतीर्थ, 8. वरुणतीर्थ, 9. फिरंगाई, 10. सिद्धाळा, 11. खंबाळा,  12. मनकर्णिकातीर्थ, 13. कपिलतीर्थ, 14. सेजाळ तळे,  15. रावणेश्‍वर, 16. शिंगोशी,  17. कुंभार तळे, 18. महार तलाव (रुद्रतीर्थ), 19. खाणीतील तलाव, 20. घोटाळे, 21. पेटाळे, 22. साकोली, 23. मस्कुती, 24. कात्यायनी, 25. सुसरबाग तळे , 26. हनुमान तलाव, 27. रमणमळा तलाव, 28. लक्षतीर्थ तलाव, 29. इंद्रकुंड, 30. साहेबांचे तळे (रेसिडेन्सी तलाव), 31. शेंडापार्क तलाव.  कोल्हापूरच्या या स्थितीचं वर्णन पुढील काव्यपंक्‍तीतून होते. 

कोल्हापूर शहर । जसं विंचवांचं तळं ।
वस्ती केली तुझ्यामुळं । अंबाबाई ॥
कोल्हापूर शहर । पाण्याच्या डबक्यात।
फुलांच्या झुबक्यात । अंबाबाई ॥

कपिलतीर्थ हा तलाव शहराच्या मध्यभागी होता. तलावातील पाण्यामध्ये भरतीत तारदखान्याचे (शौचकूप ) पाणी झिरपून मिसळत असल्याने तो दूषित झाला होता. सार्वजनिक आरोग्यास धोकादायक असल्याने हा तलाव मुजविला. आज या ठिकाणी कपिलतीर्थ मार्केट उभे आहे. महार (रुद्रतीर्थ) तलाव मुजवून लक्ष्मीपुरी वसाहत स्थापन केली. सुसरबाग तळे मुजवून बाग तयार केली. आज न्यू एज्युकेशन सोसायटी ही मुजविलेल्या  फिरंगाई तलावावर उभी आहे. वरुणतीर्थ कोरडे करून तिथे गांधी मैदान तयार केले. मस्कुती तलावाच्या ठिकाणी वसाहत निर्माण झाली. रावणेश्‍वर तलाव कोरडा करून तिथे शाहू स्टेडियम उभारले. साकोलीचे तळे म्हणजे शिवाजी पेठेतील दलदलीचा प्रदेश होता. राजर्षी शाहू महाराजांच्या काळात 1891 च्या दरम्यान घोटाळे तलावाच्या परिसरात रेल्वेस्थानकाची उभारणी झाली. एस. एम. लोहिया तसेच पद्माराजे हायस्कूल  पेटाळे तलावाच्या जागी आहेत. रमणमळा तलावाचे रूपांतर वॉटर पार्कमध्ये झाले. सिद्धाळा गार्डनही सिद्धाळा तलावाच्या जागी फुलले आहे. शिंगोशी तलावाच्या जागी मार्केट व वसाहत आहे. अंबाबाई मंदिरात जी छोटीशी बाग आहे, ती मनकर्णिका तीर्थ मुजवून केली आहे. 

सरस्वती टॉकीज आणि आसपासच्या भागात पूर्वी खंबाळे तलाव होता. पद्माळा तलावातील पाणी सांडवा काढून बाहेर सोडण्यात आले होते; पण तेथील पाणथळ जागा कायम राहिली होती. या तलावात भरपूर कमळे होती. पद्माळ्याचे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी वापरत. आज या ठिकाणी क्रीडासंकुल उभारले आहे. या तलावाभोवतीचा प्रदेश रेसकोर्स म्हणून प्रसिद्ध आहे. हा झाला कोल्हापूरच्या ज्ञात-अज्ञात तलावांचा इतिहास.

- डॉ. मकरंद मो. ऐतवडे,
निसर्ग व इतिहास अभ्यासक