Tue, Jul 16, 2019 11:44होमपेज › Kolhapur › सीपीआरमध्ये परिचारिकांचे रुग्णांशी उद्धट वर्तन

सीपीआरमध्ये परिचारिकांचे रुग्णांशी उद्धट वर्तन

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 10 2018 12:58AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

गेल्या काही वर्षांपासून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) विविध कारणांनी चर्चेत आहे. ही मलिनता धुऊन काढण्यासाठी दोन वर्षे येथील अधिकारी दिवसरात्र झटत आहेत; पण परिचारिका व परिचर यांच्या उद्धट वर्तनामुळे रुग्ण व नातेवाईक वैतागले आहेत. मंगळावारी (दि. 9) येथील स्त्रीरुग्ण तपासणी कक्षात दोन नर्सेस यांनी रुग्ण, नातेवाईक  व वृद्ध नागरिकांबरोबर उद्धट वर्तन करून वाद घातला. याप्रकरणी सीपीआर प्रशासनाने संबंधित नर्सेसना कडक शब्दांत सुनावले. 

दर्जेदार सुविधांमुळे सीपीआरचा जनमाणसात विश्‍वास दृढ झाला आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत मोठी भर पडली आहे. लोकप्रतिनिधींनीदेखील निधीसाठी सातत्य ठेवले आहे. त्यामुळेच येथे अत्याधुनिक उपकरणे आली आहेत. राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठात डॉ. जयप्रकाश रामानंद व वैद्यकीय अधीक्षक शिशिर मिरगुंडे यांनीही निधी आणि विविध योजनांसाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. काही कामचुकार परिचारिका व कर्मचारी, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी उद्धट वर्तन करत आहेत. काही कर्मचारी वरिष्ठांनाही जुमानत नसल्याची चर्चा रुग्णालयात आहे. कारवाई केल्यास आंदोलनाचे हत्यार उपसण्याची भाषा केली जात असल्यामुळे वरिष्ठही हतबल झाले आहेत. 

पंधरा दिवसांपूर्वी प्रसूती विभागात पैसे घेतल्याच्या कारणावरून चार महिलांना निलंबित केले आहे. ही घटना ताजी असतानाच आता परिचारिका रुग्णांशी उद्धट वर्तन करीत आहेत. या उद्धट वर्तनामुळे रुग्णालयाची सुधारत चाललेली प्रतिमा ढासळण्यास वेळ लागणार नाही. सीपीआर प्रशासनाने परिचारिका व परिचर यांना वेळीच डोस देणे गरजेचे आहे; अन्यथा  रुग्णांचे नातेवाईकच त्यांना कधीतरी डोस देतील.