Sun, Jul 21, 2019 16:16
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › दै. ‘पुढारी’तर्फे महिला आत्मसंरक्षण उपक्रमाचे आज उद्घाटन

दै. ‘पुढारी’तर्फे महिला आत्मसंरक्षण उपक्रमाचे आज उद्घाटन

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 10 2018 1:42AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

महिला सबलीकरणाच्या उद्देशाने दै. ‘पुढारी’ संचलित प्रयोग फौंडेशनने हाती घेतलेल्या ताराराणी आत्मसंरक्षण प्रशिक्षण उपक्रमाचा प्रारंभ बुधवारी (दि.10) आयोजित केला आहे. हा समारंभ येथील पेटाळा परिसरातील प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या मैदानावर दुपारी साडेतीन वाजता होणार आहे. शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या समारंभाचे प्रमुख पाहुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आहेत.

या उपक्रमांतर्गत शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थिनींना ज्युदो कराटेचे दोन महिन्यांचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. समाजाच्या सर्व थरातील युवती आणि महिलांना आत्मसंरक्षण करता यावे, हा प्रमुख उद्देश या उपक्रमाचा आहे. कोल्हापूर कुराश असोसिएशन व न्यू ज्युदो कराटे प्रशिक्षण केंद्र यांच्या सहकार्याने युवती आणि महिलांना ज्युदो कराटेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. गरजू विद्यार्थिनी आणि महिलांना मोफत दिल्या जाणार्‍या या प्रशिक्षणातून समाजकंटकांविरोधात भक्कमपणे लढण्याचे तंत्र आणि मानसिक बळ त्यांना प्राप्त होणार आहे. 

शहर आणि परिसरातील शाळा, महाविद्यालयांतून या उपक्रमाच्या नोंदणीस प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. प्रायोगिक तत्त्वावर गेल्या काही दिवसांत हे प्रशिक्षण देण्यात आले. ज्यांनी हे प्रशिक्षण घेतले अशा विद्यार्थिनी आणि महिलांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. या उपक्रमाचे अधिकृत उद्घाटन आणि पुढे सातत्यपूर्ण प्रशिक्षण बुधवारपासून सुरू होत आहे. उद्घाटन समारंभात विक्रीकर निरीक्षकपदी राज्यात मुलींमध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या प्राची भिवसे, आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर रेश्मा माने यांचा गौरव करण्यात येणार आहे. या उपक्रमादरम्यान युवती आणि महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांसह विविध विषयांवर व्याख्यानांचेही आयोजन केले जाणार आहे. या विषयातील तज्ज्ञांकडून व्याखानाद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे.