कोल्हापूर : एकनाथ नाईक
लाकडी चार खांब...सडलेल्या पत्र्याचा आडोसा...मुलगी संस्कृतीची सोबत...अंध असूनही वृत्तपत्र विक्रीतून मोडक्या संसाराला टेकू देण्याचा त्यांचा प्रयत्न...उच्च विचारसरणी... स्वत: अंध असूनही मुलगी संस्कृतीसाठी पती-पत्नीची धडपड सुरू आहे. ही मन हेलावून टाकणारी कहाणी आहे, टाकाळा चौकात राहणार्या केसरकर परिवाराची. त्यांच्या जिद्दीला दातृत्वाचे हात मिळाल्यास संस्कृतीच्या जीवनात निश्चितच प्रकाश पडेल, यात शंका नाही.
टाकाळा चौकात गजबजलेल्या परिसरात, पण खुरट्या झुडपांमध्ये सुरेश केसरकर यांचे घर आहे. पाहिल्यानंतर त्याला कोणी घर म्हणणारच नाही; पण त्यांच्यासाठी ते घरच आहे. डोळस असताना वीस वर्षे सुरेश केसरकर यांनी रिक्षा चालवली. अचानक त्यांच्या उजव्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली.त्यातच त्यांचा डोळा निकामी झाला.त्यानंतर एका खासगी कंपनीत सुरेश यांना चांगल्या पगाराची नोकरीही मिळाली. निर्व्यसनी, उच्च विचारसरणी असणार्या सुरेश यांना त्यांच्या मित्राने अंध असलेल्या अस्मिताचे स्थळ सुचविले. अस्मिताच्या जीवनात आनंदचा ‘प्रकाश’ पाडण्यासाठी त्यांनी होकार दिला.सुरेश यांच्या घरच्यांनी लग्नाला विरोध केला; पण मित्राला दिलेल्या शब्दाला ते जागले.
आनंदाने संसार फुलत असतानाच काळाने त्यांच्या डाव्या डोळ्यावर झडप घालून हिरावून घेतला. केसरकर कुटुंबीयांवर यामुळे आभाळच कोसळले; पण जिद्दीने त्यांनी संसार फुलविण्याचे स्वप्न उराशी बाळगून धडपड सुरूच ठेवली. या दाम्पत्याला 2003 मध्ये कन्यारत्न झाले. तिचे नाव त्यांनी संस्कृती असे ठेवले. आलेल्या संकटांना दूर लोटत सुरेश व अस्मिता यांनी संस्कृतीचा सांभाळ केला. बघताबघता संस्कृती मोठी झाली.आज संस्कृती आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकते. तिला शिकवून अधिकारी करण्याचे या दाम्पत्याचे स्वप्न आहे. आई-वडिलांना घरकामात मदत करून अंबाबाई मंदिर परिसरात ती वृत्तपत्र, कॅलेंडर, खेळणी विक्री करून शिक्षणाचे धडे संस्कृती गिरवत आहे. संस्कृतीला शिकून डीएसपी व्हायचं आहे. जिद्दीला समाजातील दातृत्वाचे हात मिळाल्यास तिचा खडतर प्रवास सुखकर होणार आहे.