होमपेज › Kolhapur › कोल्हापूरकरांचा बीपी ‘हाय’...!

कोल्हापूरकरांचा बीपी ‘हाय’...!

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 16 2018 11:33PMकोल्हापूर : एकनाथ नाईक 

स्पर्धेच्या युगात सुरू असणारी प्रचंड धावपळ, बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण आणि आरोग्याच्या विविध समस्या यामुळे नागरिकांना उच्च रक्‍तदाबाच्या समस्येला  सामोरे जावे लागत आहे. राज्यात 25.1 टक्के लोकांना उच्च रक्‍तदाबाचा (ब्लडप्रेशर) आजार जडला आहे. कोल्हापुरात 26.2 टक्के लोकांना, तर सातारा, मुंबई, धुळे, गडचिरोली जिल्ह्यांत याचे सर्वाधिक म्हणजे 30 टक्के असे प्रमाण आहे. सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 20 टक्के लोकांना उच्च रक्‍तदाब असल्याचे आढळून आले आहे. सांख्यिकीशास्त्रतज्ज्ञ डॉ. एम. डी. भिसे व डॉ. एस. पत्रा यांच्या सर्वेक्षणातून ही गंभीर बाब पुढे आली आहे. त्यामुळे तरुणांसह वयोवृद्धांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. 

राज्यातील 18 ते 29 वर्षे वयोगटातील 14 टक्के तरुण या आजाराचे बळी ठरले आहेत. त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ही गंभीर बाब असून तरुणांनी जंकफूड आणि व्यसनांपासून दूर राहणे महत्त्वाचे आहे. 30 ते 39 गटात 20 टक्के, 40 ते 49 गटात 27 टक्के, 50 ते 60 वयोगटात 34 टक्के, तर 60 च्या पुढे याचे प्रमाण वयोमानानुसार 41 टक्के आहे. महाराष्ट्रातील महिलांमध्ये रक्‍तदाबाचे प्रमाण 23 टक्के, तर पुरुषांमध्ये याचे प्रमाण 28 टक्के आहे. वाढते वय, व्यसनाधीनता, ताण, लठ्ठपणा, धूम्रपान, तंबाखू, दारू, जेवणात मिठाचे प्रमाण अधिक आणि अनियंत्रित आहार यामुळे अनेकजन उच्च रक्तदाबाचे बळी ठरू लागले आहेत. विशेष म्हणजे 60 टक्के लोकांनमध्ये या आजाराची लक्षणेच दिसून येत नाहीत. मानवी शरिराला चकवा देऊन सायलंट किलर सारखा हा रोग शरीरात वाढून वास्तव्य करतो.याची प्राथमिक लक्षणे म्हणजे, घाम फुटणे, डोके दुखणे व जड होणे, पायाला सुज, दम लागणे आणि कारण नसताना अशक्तपणा वाटतो अशी त्यांची साधारणपणे लक्षणे आहेत. 

हा रोग टाळ्यासाठी आहारात बदल हा महत्वाचा घटक आहे.लोणचं, बेकरीतील पदार्थ, फिंगर चिप्स, नुडल्स्, दारू, तंबाखू आणि लाल मिठ हे टाळलेच पाहिजे. केळी, साय काढलेले दूध, ताज्या पालेभाज्या, सोयाबीन, बटाटा, बेदाणे, काळी द्राक्षे, आलं आणि कडधान्यांचा  जेवणात समावेश असावा.याचे नियमित सेवन केल्या रक्‍तदाबावर नियंत्रण मिळविणे शक्य होते.त्याचबरोबर नियमित व्यायाम आणि तणावमक्‍त जीवन हे महत्वाचे आहे.उच्च रक्तदाबाकडे दुर्लक्ष केल्यास ह्दयरोग, अर्धांगवायूव, मधुमेह किंवा धमणीचे आजार होऊ शकतात.उच्च रक्‍तदाब समस्या जडलेल्या  रूग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळेत तपासणी करून घेणे महत्वाचे आहे.डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेत घेतल्यास या आजारावर नियंत्रण शक्य आहे.

कोल्हापुरात प्रमाण वाढते का ? 

कोल्हापुरात उच्च रक्‍तदाबाच्या रुग्णवाढीचे मुख्य कारण म्हणजे, येथील अनेक जण तांबड्या-पांढर्‍या रश्श्यावर ताव मारतात. मसालेदार पदार्थांचे अधिक सेवन करतात. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात ब्लडप्रेशर (रक्‍तदाब) रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.