Tue, Apr 23, 2019 23:57होमपेज › Kolhapur › किती पैसे आले, किती खर्च केले, हिशेब द्यावा लागेल

किती पैसे आले, किती खर्च केले, हिशेब द्यावा लागेल

Published On: Dec 07 2017 2:10AM | Last Updated: Dec 07 2017 1:01AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

महापालिकेत कशाचा कशाला पत्ता लागत नाही, असे सांगत किती पैसे आले, किती खर्च केले, याचा हिशेब द्यावा लागेल, त्यासाठी यंत्रणा कामाला लावा, अशा शब्दांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेला सुनावले. यासह सर्वच विभागांचा दि. 1 ते दि. 10 जानेवारी या कालावधीत आढावा घेतला जाईल, दररोज सहा बैठका होतील, त्यामुळे तयारी करा, अशा सक्त सूचनाही त्यांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नगरसेवक भूपाल शेटे यांनी महापालिकेने गेल्या चार वर्षांत सामाजिक न्यायासाठी असलेला निधी खर्च केला नसल्याचे सांगितले. त्यावर तांत्रिक कारणास्तव हा निधी खर्च झाला नसल्याचे सांगण्यात आले. काही सदस्यांनी वेळेवर निधी मिळत नसल्याचे सांगितले. त्यावर यापूर्वीच्या निधीचा खर्च सादर न केल्याने नवा निधी प्रलंबित असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. 

या सर्व पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री पाटील यांनी निधी खर्चाबाबत संबंधित विभागांना खडे बोल सुनावले. चार वर्षांचा राहू दे, किमान दोन वर्षांत तरी आलेला निधी आणि खर्च झालेला निधी याची माहिती द्या, असे महापालिका प्रशासनाला सांगितले. प्रत्येक विभागानेच मिळालेला निधी, खर्च झालेला निधी याबाबतची सर्व माहिती तयार ठेवावी, त्याबाबत जानेवारी महिन्यात आढावा बैठका घेतल्या जातील. दरम्यान, डिसेंबरअखेर सर्व कामांची प्रशासकीय मान्यता घ्या, कामे तत्काळ सुरू करा, अशा सूचनाही पाटील यांनी बैठकीत दिल्या.