Tue, Mar 19, 2019 03:19होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : जि.प.समोर आत्मदहनाचा प्रयत्न

कोल्हापूर : जि.प.समोर आत्मदहनाचा प्रयत्न

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 28 2018 1:27AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

शासकीय गायरानमधील अतिक्रमण काढण्याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही जिल्हा परिषद प्रशासन दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ जिल्हा परिषदेसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार्‍याला जिल्हा परिषद कर्मचार्‍यांनीच रोखले. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. शिवाजी गुंगा इंगवले (रा. पिशवी, ता. शाहूवाडी) असे त्याचे नाव आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पिसाईदेवी देवस्थान 409 मध्ये गायरान जागा गट नं. 1997 असून त्या जागेचे क्षेत्र 13 हेक्टर 62 गुंठे आहे. ही जागा पिशवी (ता. शाहूवाडी) ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली आहे. या ठिकाणी 2015 मध्ये शासकीय योजनेतून वृक्ष लावण्यात आले होते. या झाडांची तोड करून या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अतिक्रमण काढून टाकण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून शिवाजी इंगवले जिल्हा परिषदेकडे करत आहेत; मात्र प्रत्येक वेळी त्यांना अश्‍वासने दिली जातात. त्यामुळे त्यांनी आज आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी सकाळपासून जिल्हा परिषदेसमोर मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. येणार्‍या प्रत्येक व्यक्तीवर पोलिस लक्ष ठेवून होते; पण त्याचबरोबर या व्यक्तीला ओळखणारे ग्रामपंचायत विभागातील कर्मचारीही आवारात उभे होते. शिवाजी इंगवले यांनी सोबत आणलेली रॉकेलची बाटली काढून अंगावर ओतून घेत असतानाच त्यांना जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांनी पकडले. त्यांना कार्यालयात घेऊन गेले. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.